माजी सरपंचासह ग्रामविकास अधिकारी अडचणीत
| अलिबाग | प्रतिनिधी |
कुर्डूस ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अनंत पाटील यांच्यासह ग्रामविकास अधिकारी अडचणीत सापडले आहेत. पदाचा गैरवापर करीत ग्रामपंचायत व केंद्राकडील चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतील 28 लाख 70 हजार 458 रुपयांचा अपहार केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला असून, अलिबागचे गटविकास अधिकारी दाईंगडे यांनी दोघांविरोधात पोयनाड पोलीस ठाण्यात तक्रार केली असून, त्याबाबत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सरपंच भाजप पक्षातील असल्याची माहिती समोर येत आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अनंत गोमा पाटील असे या तत्कालीन सरपंचाचे नाव असून, सुनील म्हात्रे असे ग्रामविकास अधिकारी यांचे नाव आहे. 13 नोव्हेंबर 2019 ते 16 जानेवारी 2021 या कालावधीत सरपंच व ग्रामविकास अधिकारी पदावर दोघेही असताना त्यांनी पदाचा वापर करीत कुर्डूस ग्रामपंचायत कार्यालयाकडील अभिलेखामध्ये खाडाखोड करून ग्रामपंचायत निधीचा तसेच केंद्राकडून आलेल्या चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतील 28 लाख 70 हजार 457 रुपयांचा अपहार केल्याची बाब गटविकास अधिकारी दाजी दाईंगडे यांच्या लक्षात आली. त्यांनी सर्व पडताळणी केल्यावर शुक्रवारी रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास पोयनाड पोलीस ठाण्यात दोघांविरोधात तक्रार दाखल केली.
आपल्या पदाचा गैरवापर करीत सर्वसामान्यांच्या हितासाठी आलेला निधी गिळंकृत करणारा सरपंच भाजप पक्षातील आहे. या गुन्ह्यातील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ए.जी. मरस्कोले करीत आहेत.