प्रदीप नाईक यांचे गौरवोद्गार
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
कोणत्याही उपक्रमाची सुरुवात करणे सोपे आहे, मात्र त्याचे सातत्य राखणे कठीण आहे. इमेज कॅलेडरने आठ वर्षात पदार्पण केले आहे. या कॅलेडरची निर्मिती, मेहनत फार महत्वाची आहे. रमेश कांबळे, जितेंद्र शिगवण आणि समिर मालोदे या तिघांनी कॅलेंडरच्या माध्यमातून जिल्हयातील पर्यटनस्थळांसह संस्कृतीची माहिती, ओळख छायाचित्राद्वारे पोहचविण्याचे काम केले आहे. पर्यटनस्थळांसह सण उत्सवाची माहिती चित्रांद्वारे कॅलेंडरच्या रुपात पहावयास मिळत असल्याचे गौरवोद्गार अलिबाग लायन्स क्लबचे अध्यक्ष तथा शेकाप कामगार आघाडीचे प्रमुख प्रदिप नाईक यांनी शनिवारी काढले.
अलिबागमधील अलिबाग प्रेस असोसिएशनच्या सभागृहात शनिवारी(दि.3) इमेज कॅलेडरच्या प्रकाशन सत्कार सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी अलिबाग नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष, विद्यमान नगरसेवक प्रशांत नाईक, सहयोग नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन योगेश मगर, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक, अलिबाग प्रेस असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश सोनावडेकर, रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष नागेश कुलकर्णी, ईमेज कॅलेंडरचे प्रमूख रमेश कांबळे, जितेंद्र शिगवण, समीर मालोदे, आदींसह पत्रकार, छायाचित्रकार, सत्कार मुर्ती व नागरिक उपस्थित होते.
यावेळी प्रदिप नाईक म्हणाले की, रमेश कांबळे, जितेंद्र शिगवण आणि समीर मालोदे या तीन छायाचित्रकारांनी एकत्र येऊन इमेज कॅलेंडरची संकल्पना प्रत्यक्षात उतरवली. रायगड जिल्ह्यातील पर्यटन स्थळांसह येथील सण उत्सवाची ओळख कॅलेंडरच्या माध्यमातून घराघरात पोहचावी यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे. छायाचित्रकारांसह ज्यांना चित्र काढण्याचे छंद आहे, अशा सर्वसामान्यांना देखील यामध्ये स्थान देण्याचे काम केले आहे. एखादा उपक्रम सुरु होतो. परंतु तो फार काळ टिकत नाही. मात्र पत्रकारिता क्षेत्रातील अलिबागमधील तीन छायाचित्रकारांनी ईमेज कॅलेंडर निर्मितीचे सातत्य राखण्याचे खऱ्या अर्थाने काम केले आहे. ईमेज कॅलेंडरला आठ वर्ष झाली आहेत. या तिघांच्या परिश्रमामुळे शक्य झाले आहे. ईमेज कॅलेंडरसाठी बारा छायाचित्रांची निवड केली आहे. या कॅलेडरमध्ये असलेल्या प्रत्येक छायाचित्रांमध्ये एक अर्थ आहे. एक वेगळी ओळख आहे. ती ओळख दाखविण्याचे काम करण्यात आले आहे, असे प्रदिप नाईक यांनी सांगितले. यावेळी योगेश मगर, मंदार वर्तक यांनीदेखील मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समीर मालोदे यांनी तर सुत्रसंचलन सुयोग आंग्रे यांनी केले.
बारा छायाचित्रकारांचा सन्मान
इमेज कॅलेंडरसाठी गडकिल्ले, पर्यटनस्थळे आदी छायाचित्रांची स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत 478 जणांनी सहभाग घेतले होते. ज्येष्ठ छायाचित्रकार जयंत धुळप यांनी परीक्षण केले. या छायाचित्रांमधून महाडमधील दीक्षित कांबळे, श्रीबागमधील वैभव शिंदे, अलिबागमधील महेंद्र महाडिक, थळमधील शुभम सुंकले, अलिबागमधील डॉ. गणेश गवळी, गोंधळपाडाधील निलेश दुदम, मुरूडमधील भारत रांजणकर, मिळकतखारमधील सनीश म्हात्रे, पेणमधील जयंत ठाकूर, महाडमधील कल्पेश पाटील, उसर येथील मोनिका औचटकर, अलिबागमधील सुनील ठोकळ यांनी काढलेल्या छायाचित्रांची निवड करण्यात आली. हे छायाचित्र इमेज कॅलेंडरमध्ये प्रसिध्द करण्यात आले. माजी नगराध्यक्ष तथा, नगरसेवक प्रशांत नाईक यांच्यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते बारा छायाचित्रकारांचा सन्मान करण्यात आला.







