रस्ता नाही तर खुर्च्या खाली करा

माडप मुठा ठाकूरवाडीत आदिवासींचा संताप; लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

| पाताळगंगा | प्रतिनिधी |

खालापूर तालुक्यातील माडप मुठा ठाकूरवाडी येथील रखडलेल्या रस्त्याच्या कामावरून आदिवासी बांधवांचा संताप सोमवारी उफाळून आला. “रस्ता पूर्ण करा, नाहीतर खुर्च्या खाली करा” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्यानंतर अखेर आंदोलनाला स्थगिती देण्यात आली.

डोंगराळ भागात वसलेल्या या वाडीत 600 हून अधिक आदिवासी बांधव वास्तव्यास आहेत. मुख्यमंत्री सडक योजनेतून या रस्त्यासाठी 9 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते मोठ्या गाजावाजात भूमीपूजनही करण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात काम रखडल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती.

संतप्त ग्रामस्थांनी चार किलोमीटर डोंगरातून पायपीट करत गावाच्या वेशीजवळ ठिय्या आंदोलन सुरू केले. यावेळी सामुदायिक आत्मदहनाचा इशाराही देण्यात आला. आदिवासी बांधवांसह महिला, तरुण आणि लहान मुलेही आंदोलनात सहभागी झाली होती. दरम्यान, रस्त्याच्या कामात वन विभागाच्या परवानगीचा मुद्दा पुढे केला जात होता. मात्र वन विभागाकडून कोणतीही अडचण नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ठेकेदाराच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. त्यामुळे आंदोलन अधिक तीव्र झाले.

अखेर चार तासांच्या आंदोलनानंतर प्रशासनाने तात्काळ काम सुरू करण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन स्थगित केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य संतोष बैलमारे, पोलीस निरीक्षक सचिन पवार, उपअभियंता आर.के. चव्हाण, कनिष्ठ अभियंता निकिता गुरव, माजी उपसभापती विश्वनाथ पाटील, सरपंच अर्चना पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version