जिद्द असेल, तर यश मिळतेच – न्या. रुची भगत

| अलिबाग | वार्ताहर |

भारताच्या न्यायव्यवस्थेत महिला न्यायाधीशांची भूमिका कायमच महत्त्वाची राहिली आहे. सर्वोच्च न्यायालयापासून ते खालच्या न्यायालयांपर्यंत महिला न्यायाधीशांनी अनेक ऐतिहासिक निकाल दिले आहेत, ते आज इतिहासाच्या पानावर लिहिले आहेत. क्षमता आणि जिद्दीच्या जोरावर महिला न्यायाधीशाचं पद चोख बजावू शकतात, फक्त त्यांना संधी मिळाली पाहिजे, असे मत अलिबाग तालुक्यातील पेझारी येथील पहिली न्यायाधीश रुची राजन भगत यांनी सांगितले. उमलत्या वयात उराशी बाळगलेलं स्वप्न खरं करीत अ‍ॅड. रुची राजन भगत यांनी वकील क्षेत्रातील, प्रथमतः एलएलबी नंतर एलएलएम त्यानंतर एमपीएससी-जेएमएमसी या ‘जज्ज’ (न्यायाधीश) होण्याच्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश संपादन केले.

रायगड जिल्ह्यातील, अलिबाग तालुक्यातील, शहापूर, गावची ही सुकन्या, वयाच्या 25 व्या वर्षी, एवढ्या लहान वयात ‘जज्ज’ होण्याचा बहुमान पटकाविला आहे. ‘दिवाणी न्यायाधीश’ म्हणून कार्यभार ती ठाणे येथील न्यायालयात सांभाळत आहे. आगरी समाजाची ही लेक, (दि.14) एप्रिल 2019 रोजी, आईचं छत्र हरवलेलं असतानाही अतिशय खडतर मेहनत, चिकाटी, जिद्द या गुणांनी आपले स्वप्न पूर्ण केले. तिचे वडील राजन भगत यांच्या पावलावर पाऊल टाकत तिने वाटचाल सुरू केली आहे. रुची भगत हिने मिळवलेले यश हे ग्रामीण भागातील मुली व विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरेल.

Exit mobile version