माथेरानला जायचंय तर नक्कीच जा…मात्र ‘या’ नियमांचे पालन करुनच

। माथेरान । प्रतिनिधी ।
लॉकडाऊन काळात घरात बसून कंटाळून गेल्यामुळे सर्व पर्यटनस्थळे खुली करण्याची पर्यटक आतुरतेने वाट पहात होते. सर्वांचे आवडते पर्यटनस्थळ म्हणून माथेरान हे नावारुपास आले आहे. स्वस्त दरात एकदिवसीय ठिकाण म्हणून माथेरानची ओळख झाली आहे. त्यामुळे माथेरान अनलॉक केल्यामुळे अनेकांनी या स्थळाला अधिकाधिक पसंती दिली आहे. कोरोनाचा सामना तर करायचा आहेच; परंतु शासनाने दिलेल्या नियम व अटींचे देखील तंतोतंत पालन करणे गरजेचे आहे. सोशल डिस्टंन्स त्याचप्रमाणे सॅनिटायझरचा वापर आणि खासकरून गर्दीच्या ठिकाणी मास्क लावणे हे बंधनकारक आहे. वेळोवेळी सूचना करूनही अनेकजण मास्कचा वापर करताना आढळून येत नाहीत. मात्र माथेरानला जायचे असेल तर या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. अन्यथा तुम्हाला माथेरानमध्ये प्रवेश नाकारला जाऊ शकतो.

माथेरानमधील नागरिकांचे संपूर्ण जीवनमान हे पर्यटनावर अवलंबून आहे. लॉकडाऊनच्या कठीण काळात स्थानिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले होते. एक विशेष बाब म्हणून हे पर्यटन सुरू केल्यामुळे आज इथला भूमिपुत्र सुखाने दोन घास आपल्या कुटुंबासह खात आहे. माथेरानमध्ये कोरोना रुग्णांची संख्या नगण्य आहे.

तरीसुद्धा येणार्‍या पर्यटकांमधून एखादेवेळी कोरोनाची बाधा उद्भवू शकते. त्यामुळे पर्यटकांनी सुध्दा काळजी घेत शासनाच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. ऐन गर्दीच्यावेळी विनामास्क अनेकजण फिरतात. अशांवर कारवाई करण्यात येत असून नगरपरिषदेच्या आणि पोलीस ठाण्याच्या माध्यमातून विना मास्क फिरणार्‍या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई केली जात असून पाचशे रुपये दंडाची रक्कम वसूल केली जात आहे. त्यामुळे माथेरानमध्ये येणार्‍या पर्यटकांनी मास्कचा वापर करून इथे प्रवेश करावा. अन्यथा दंडात्मक कारवाईला सामोरे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Exit mobile version