तिकिट हवंय? निवडणूकीत उभं रहायचंय, मग हे करावं लागेल…

काँग्रेसचा नवा फंडा; सर्वत्र चर्चेला उधाण
। उत्तर प्रदेश । वृत्तसंस्था ।
उत्तर प्रदेशमध्ये पुढच्या वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्ष त्यादृष्टीने तयारीला लागला आहेत. तर, दुसरीकडे विविध राजकीय पक्षांकडून तिकीट मिळवण्यासाठी उमेदवारांनी देखील कंबर कसली आहे. अशातच तिकीटे मागणार्‍यांसाठी काँग्रेसने युक्ती लढवली आहे. ज्यांना आमदारकीसाठी पक्षाचं तिकीट हवंय, त्या उमेदवारांना त्यांच्या अर्जासह 11 हजार रुपये जमा करण्यास सांगितलं आहे. जे उमेदवार निवडणूक लढवण्यास गंभीर नाहीत, अशांना दूर ठेवण्यासाठी पक्षाने हे पाऊल उचललं असल्याचं म्हटलं जातंय.

सर्व अर्जदारांनी जिल्हा/राज्य स्तरावरील अधिकृत व्यक्तींकडे 11 हजार रुपयांच्या योगदान रकमेसह आपले अर्ज 25 सप्टेंबर 2021 पर्यंत सादर करावेत, असे उत्तर प्रदेश काँग्रेस कमिटीने (यूपीसीसी) मंगळवारी जारी केलेल्या आदेशात अध्यक्ष अजय कुमार लल्लू यांनी म्हटलंय. दरम्यान, पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा यांच्या नेतृत्वाखाली दोन दिवसांच्या विचारमंथन सत्रानंतर गेल्या आठवड्यात संभाव्य उमेदवारांकडून काँग्रेसने अर्ज मागवले होते.

आगामी निवडणुका लढवण्यास इच्छुक असलेले उमेदवार राज्य किंवा जिल्हा मुख्यालयात अर्ज देऊ शकतात, असे काँग्रेस प्रवक्ते उमा शंकर पांडे यांनी शनिवारी सांगितले होते. तर योगदानाची रक्कम मागण्याचा निर्णय स्पष्ट करताना पक्षाचे प्रवक्ते अशोक सिंह म्हणाले की, हे पाऊल निवडणुकीत गंभीर नसलेल्या उमेदवारांची तपासणी करण्यासाठी आहे.

पक्षाच्या एका वरिष्ठ पदाधिकार्‍याने सांगितले की, नामांकन प्रक्रिया सुरू झाल्यानंतर, जे लोक गंभीर नसतात ते देखील निवडणूक रिंगणात उतरतात आणि अनावश्यक गोंधळ निर्माण करतात. तसेच योगदान रक्कम मागण्यात काही नवीन नाही. सर्व विरोधी पक्ष देखील डिपॉझिट रक्कम पक्षाच्या खात्यात जमा करवून घेतात. काही जण तर तिकीट वाटपासाठी वैयक्तिकरित्या मोठी रक्कम घेतात आणि त्यासाठीच ते बदनाम असतात, असंही ते म्हणाले. यूपीसीसीचे मीडिया संयोजक ललन कुमार म्हणाले की, निवडणूक प्रक्रिया सुधारण्यासाठी आणि उमेदवार ठऱवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. ही सर्व प्रक्रिया पारदर्शक आहे. जी रक्कम घेतली जातीए ती यूपीसीसी फंडात जमा केली जाईल.

Exit mobile version