‌‘एसटी’कडून ‌‘हिरकणी’ची हेळसांड

स्तनदा मातांची कुचंबणा; पेण आगारात धुळीचे साम्राज्य

| पेण | मुस्कान खान |

स्तनदा मातांची एसटी बसस्थानकात होणारी गैरसोय टाळण्यासाठी परिवहन महामंडळाने तालुक्याच्या प्रत्येक ठिकाणी असलेल्या बसस्थानकात हिरकणी नावाने स्वतंत्र कक्ष स्थापन केले आहेत. पेण स्थानकात असलेला हा हिरकणी कक्ष मात्र नावालाच उरला आहे. या कक्षामध्ये कसल्याच सुविधा नसल्याने स्तनदा मातांची गैरसोय होत आहे.

रायगड जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण म्हणजे पेण शहर. या पेण शहराच्या बसस्थानकाची दुरवस्था पाहता आपण बसस्थानकात उभे आहोत की, एखाद्या धुळीच्या साम्राज्यात, असेच प्रथमदर्शनी वाटते. याच बसस्थानकाच्या हिरकणी कक्षाला कृषीवलच्या प्रतिनिधीने भेट दिली असता खूपच विदारक चित्र पहायला मिळाले. या कक्षाच्या भिंतीवर कित्येक ठिकाणी शेवाळ पकडलेले असून, भिंतीच्या प्लास्टरचे पापुदरे सुटलेले आहेत, याठिकाणी धुळीचे तर साम्राज्य दिसून येते. तसेच बसण्यासाठी ठेवलेले बाकडे मोडलेल्या स्थितीत, फॅन पण बंद अवस्थेत. लाईटचा तर पत्ताच नाही. तसेच, याच कक्षात महिला वाहकांसाठी लॉकर आहे, तोही धुळीने पूर्णपणे माकलेला. पडद्यांची अवस्था पाहता पूर्ण मळकटलेले. अशी विदारक अवस्था या हिकरणी कक्षाची झालेली आहे. परंतु, एसटी व्यवस्थापना याची कितपत फिकरीर आहे, हे या कक्षाची अवस्था पाहिल्यानंतरच स्पष्ट होत आहे.

एसटीचा प्रवास हा सुरक्षित व सुखाचा समजला जातो. त्यामुळे प्रवाशांची प्रथम पसंती एसटी बसला असते. त्यातच महिलांना एसटीमध्ये अर्धतिकिटात प्रवास ही सुविधा राज्य सरकारकडून सुरू करण्यात आल्यापासून तर प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यामध्ये महिलांची संख्या अधिक आहे. असे असताना ज्या उद्देशाने हिरकणी कक्षाची उभारणी बस स्थानकांमध्ये करण्यात आली आहे, याचा आगार प्रशासनाला विसर पडल्याचे चित्र आहे. कारण, या कक्षाच्या दुरवस्थेमुळे बसस्थानकात येणाऱ्या प्रवासी स्तनदा मातांना उघड्यावर बसावे लागत असून, त्यांची कुचंबणा होत आहे.

अभियान फक्त नावाला
हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बसस्थानक या अभियानांतर्गत शासनाने संपूर्ण महाराष्ट्रात स्पर्धेचे आयोजन केले आहे. जेणे करून भकास वाटणारे बसस्थानक स्वच्छ व सुंदर दिसावे. परंतु, असे असतानाही बस स्थानकाची अवस्था पूर्वी होती त्यापेक्षा वेगळी नाही. त्यामुळे अभियान फक्त कागदावरच राहिल्याची चर्चा प्रवाशांमधून जोर धरत आहे.

स्थानकप्रमुख अनभिज्ञ
स्थानकातील दुरावस्थेबाबत कृषीवल प्रतिनिधीने स्थानक प्रमुख अपर्णा वर्तक यांना प्रत्यक्ष भेटून सांगितले. त्यांना वस्तुस्थितीची खात्री पटत नव्हती. त्यांना हिरकणी कक्षाची पाहणी करण्याची विनंती केली. स्वतः पाहणी केल्यानंतर विदारक अवस्था समोर आली. त्यानंतर लागलीच स्वच्छता कर्मचाऱ्यांना हिरकणी कक्ष स्वच्छ करण्यास सांगितले. तसेच यापुढे हिरकणी कक्ष स्वच्छ असेल, अशी ग्वाही दिली. आगारप्रमुखच स्वच्छतेबाबतीत अनभिज्ञ असतील, तर स्वच्छतेची अपेक्षा कुणाकडून ठेवावी, असे प्रवाशांकडून बोलले जात आहे.

Exit mobile version