कळंबोली येथील अनधिकृत हातगाड्यांकडे दुर्लक्ष

| पनवेल | प्रतिनिधी |

कळंबोलीजवळच्या महामार्गावरच मोठ्या प्रमाणात अंडा बुर्जी आणि चायनीज खाद्य पदार्थांच्या गाड्या लावण्यात आलेल्या आहेत. या ठिकाणी महामार्गाच्या किनार्‍यावरच लावण्यात आलेल्या या गाड्यांवर खाद्य पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी वाहन चालक मोठी गर्दी करत असून, रस्त्यावरच वाहने उभी केली जात असल्याने भविष्यात या भागात एखादा अपघात घडल्यास याला जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. महत्वाचे म्हणजे मुख्य रस्त्यावरच खुलेआम सुरु असलेल्या या प्रकाराकडे पालिकेचे अतिक्रमन विभाग आणि स्थानिक पोलीसांकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे.

सायन – पनवेल महामार्गांवर कळंबोली गाव या ठिकाणी मुबंई – पुणे द्रुतगती महामार्गाचे प्रवेशद्वार आहे. या ठिकानावरून राज्य तसेच इतर राज्यभरात जाणार्‍या प्रवाशी वाहनांचा थांबा असल्याने दररोज या थांब्यांवर हजारो प्रवाशी येत असतात. याचाच फायदा उचलण्यासाठी या भागात मोठ्या संख्येने खाद्य पदार्थ विक्रीची दुकाने थाटण्यात आली आहेत. सुरवातीला लहान स्वरूपात थाटण्यात आलेल्या या दुकानानी आता मोठ्या व्यवसायाचे स्वरूप प्राप्त केले आहे. महामार्गा शेजारील पदपथ या व्यावसायिकानी गिळंकृत केले असून, शेजारील मोकळ्या जागांचा वापर देखील हे व्यावसायिक करत आहेत. तर आपल्या व्यवसायाची जाहिरात करून जास्तीत जास्त वाहनचालकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी या व्यवसायिकानी आपल्या दुकानावर आकर्षक रोषणाई केलेली असल्याचे पाहायला मिळत आहे. तर आपल्या व्यवसायाचे जाहिरात फलक महमार्गांवरच लावण्याचे काम करून महामार्गाचा वापर देखील हे व्यावसायिक करत असल्याने पालिकेचे अतिक्रमन विभाग, वाहतूक पोलीस आणि स्थानिक पोलीस या विरोधात कारवाई करतील का असा प्रश्‍न उपस्थित करण्यात येत आहे.

Exit mobile version