अनेकांचे संसार उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार व्यसनात
| रेवदंडा | विशेष प्रतिनिधी |
रेवदंडा शहर आणि पोलीस ठाण्याच्या हद्दीत ‘खाकीची’ लाज बाळगणारे दिसून येत नसल्याचा आरोप होत आहे. कारण, पोलिसांच्या आशीर्वादाने सगळे अवैध धंदे तेजीत सुरू असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थ निलेश फुंडे यांनी केला आहे. मटका, जुगार, समुद्रकिनारी वाळूची चोरटी वाहतूक, डिझेल आणि रॉकेलची तस्करी आदी अवैध धंदे तेजीत सुरू असताना, पोलीस अधिकारी झोपेचे सोंग घेत आहेत. दरम्यान, अवैध धंद्यांवर कारवाईचा फास आवळण्यात महत्त्वाची भूमिका असलेले पोलीसच वसुलीच्या कामात गर्क असल्याचाही आरोपही फुंडे यांनी केला आहे.
रेवदंडा शहर व परिसरात सध्या मटका जुगाराचा सुळसुळाट झाला आहे. 20 पेक्षा अधिक अड्ड्यांवर ऑनलाइन आणि ऑफलाइन मटका खुलेआम सुरू असून, या अड्ड्यांवर कारवाई न होणं म्हणजे स्थानिक पोलीस यंत्रणा आणि अवैध माफियांमध्ये साटंलोटं असल्याचा आरोप निलेश फुंडे यांनी केला आहे. या जुगारामुळे अनेकांचे घरसंसार उद्ध्वस्त होत आहेत, कामगार आणि सेवानिवृत्त नागरिकांचे आयुष्य अंधारात जात आहे, आणि विशेषतः सुशिक्षित बेरोजगार तरुण मटक्याच्या विळख्यात अडकत चालले आहेत.
झटपट श्रीमंत होण्याच्या नादात, आणि योग्य नोकरी व्यवसायाच्या संधी उपलब्ध नसल्यामुळे, उच्चशिक्षित तरुणदेखील मटक्याच्या अड्ड्यांकडे ओढले जाऊ लागले आहेत. रेवंदडा परिसरात सुरू असणार्या अवैध धंद्यांवर कारवाई करण्याऐवजी त्यांना संरक्षण पुरवण्यात येत असून, त्याबदल्यात हप्तेवसुली करण्यात येत असल्याचा आरोप नागरिक करीत आहे. पोलीस आणि मटकाचालक संगनमत करुन खुलेआम अवैध धंदा जोरात सुरू आहे. आम्ही पोलिसांना हप्ते देतो, त्यामुळे आमचे कुणीच काहीही करु शकत नाही, अशी अरेरावीची भाषा मटकाचालक वापरत आहेत. दरम्यान, कारवाईत सातत्य नसल्याने जुगार जोरात सुरू असून, अनेकजण कर्जबाजारी होऊन आत्महत्या करत आहेत. ठराविक रक्कम दरमहा पोहोच केली जात असल्याने मटकाचालकांवर कारवाई होत नाही. त्यामुळे राजरोजसपणे जुगार सुरू असताना पोलीस दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक करीत आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी या गंभीर बाबीकडे लक्ष देण्याची गरज आहे.
या ठिकाणी जुगाराचे अड्डे
रेवदंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चौल नाका (3 ठिकाणी), गोलबादेवी परिसर (2), जाखमाता (2), आग्राव (4), पिरांचे देऊळ (2), रेवदंडा हायस्कूल परिसर (3), थेरोंडा (4), आंग्रेनगर (3), पारनाका (2), गोळा स्टॉप व हरेश्वर मंदिर बंदर (प्रत्येकी 1), जुनी पोस्टाची गल्ली (2), साळाव गाव (2), वाहतूक (2), बोर्ली (4), कोर्लई (3), वळके वाहतूक (2), वावे (3), रामराज (3) या ठिकाणी खुलेआम मटका जुगार खेळण्यात येत आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी, दोषी पोलिसांवर कारवाई करावी, आणि समाजविघातक मटका व्यवसायाला मुळापासून थांबवावं, अन्यथा मोठं जनआंदोलन उभं राहील, आणि प्रशासनाला थेट जबाबदार धरलं जाईल.
निलेश फुंडे,
स्थानिक नागरिक, रेवदंडा
वरिष्ठांकडून हप्तवसुलीचे आदेश?
एका पोलीस कर्मचार्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, वरिष्ठ पोलीस अधिकार्यांच्या पुढे आमचं काही चालत नाही. आम्हाला सांगितलंय की, हप्ते गोळा करा. कायदा सुव्यवस्था बिघडते म्हणून आम्ही दोषी ठरतो. पण, आम्ही वरिष्ठांपुढे हतबल आहोत.
साहेबांनी फोन घेणे टाळले
अवैध मटका जुगाराविरोधात काय कारवाई करणार, याविषयी माहिती जाणून घेण्यासाठी रेवदंडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकांत किरवले यांना विचारणा करण्यासाठी तीन दिवसांपासून त्यांच्या भ्रमणध्वनीवरुन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, साहेबांनी फोन घेणे टाळल्याचे फुंडे यांनी सांगितले.







