कारवाई करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर अधिकाऱ्यांचा लगाम
| अलिबाग | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यामध्ये मटका, जुगार, क्लबसारखे धंदे खुलेआमपणे चालत आहेत. या धंद्यांवर रायगड पोलिसांनी ‘सोयीस्कर’पणे दुर्लक्ष केल्याने अनेकांचे संसार उद्ध्वस्त होण्याची भीती निर्माण झाली आहे. अवैध धंद्यांच्या कारणावरुन हाणामारी झाली, उद्या कोणचा जीव जाऊन जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवल्यास त्याला जबाबदार कोण? दरम्यान, या अवैध धंद्यांवर कारवाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अधिकाऱ्यांकडून लगाम बसविला जात असल्याची चर्चा जोरात सुरु आहे.
जिल्ह्यात पर्यटनाबरोबरच औद्योगिकीकरण झपाट्याने वाढत आहे. त्याचाच फायदा घेत काही जण अंमली पदार्थांची तस्करी करीत आहेत. अंमली पदार्थांच्या आहारी जाऊन तरुणाई बिघडण्याची भीती निर्माण झाली आहे. दरम्यान, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी जिल्ह्यातील बंद असलेल्या केमिकल कारखान्यांची माहिती घेऊन त्याठिकाणी सुरु असलेल्या अंमली पदार्थ तस्करीवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला. गांजासह चरससारखे अंमली पदार्थ जप्त करून अनेकांवर कारवाई केली. पोलिसांच्या या कारवाईचे जिल्ह्यातील नागरिकांकडून कौतुक करण्यात आले आहे.
मात्र, जिल्ह्यात अलिबागसह अनेक तालुक्यांत शहरी व ग्रामीण भागात खुलेआमपणे मटका, जुगार, चक्री, क्लबसारखे अवैध धंदे सुरु आहेत. जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या अलिबागमध्ये पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर शहरात व ग्रामीण भागात हे धंदे राजरोसपणे सुरु असतानादेखील पोलीस त्यांच्यावर कारवाई करण्यास दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. या धंद्यांना पोलिसांची मोठी कृपा मिळाली असल्याचे बोलले जात आहे. चरस, गांजा व अन्य अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा गाजावाजा करणारे पोलीस अधीक्षकांनी याकडेदेखील लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. सोमनाथ घार्गे याकडे गांभीर्याने लक्ष देतील, अशी रायगड जिल्ह्यातील नागरिकांची अपेक्षा आहे.
जुगारामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त जिल्ह्यातील बहुतांशी नागरिक मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. परंतु, काही नागरिक जुगार, क्लबमध्ये जाऊन पैशाची उधळून करीत आहेत. त्यामुळे अनेकवेळा कुटुंबात वादही निर्माण होतात. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण होतो. त्यामुळे संसार उद्ध्वस्त होण्याची भीती निर्माण झाली आहे. या जुगार, क्लब, चक्री धंद्यांवर पोलीस कारवाई करतील का, असा प्रश्न निर्माण केला जात आहे.
जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला सूचना करण्यात आल्या आहेत. ज्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अवैध धंदे सुरु असतील, त्या पोलीस ठाण्यांतील प्रभारी अधिकाऱ्यांना सूचना करून कारवाई करण्यास सांगितले जाईल.
सोमनाथ घार्गे,
पोलीस अधीक्षक, रायगड