शासकीय जागेवर बेकायदेशीर बांधकाम

सामाजिक कार्यकर्ते अनंत सानप यांचा आरोप

| अलिबाग | प्रतिनिधी |

रोहा तालुक्यातील पुई ग्रामपंचायतीने शासकीय जागेवर बेकायदेशीर बांधकाम केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते अनंत सानप यांनी केला आहे. याबाबत शासकीय कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई करावी, अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. पुई येथील गट क्रमांक 226 मध्ये महाराष्ट्र शासनाचा हक्क असलेली जागा आहे. या जागेच्या सातबारा उताऱ्यावर तशी नोंद आहे. मात्र, पुई ग्रामपंचायतीने महसूल प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता या जागेवर अतिक्रमण करून बांधकाम सुरु केले आहे. 2021- 2022 या आर्थिक वर्षात मूलभूत सुविधा योजनेंतर्गत स्मशानभूमी शेड व सुशोभिकरण करण्यासाठी बांधकाम केले आहे. मात्र, जिल्हा प्रशासनाची कोणताही परवानगी न घेता हे बांधकाम केल्याचा आरोप सानप यांनी केला आहे.

याबाबत रोहा पंचायत समिती बांधकाम विभागाचे अनिल उपअभियंता जांभळे व जिल्हा परिषदचे बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता पी. राऊत यांच्याकडे तक्रार केली आहे. मात्र, त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली नाही. पैसे खाण्याच्या उद्देशाने संगमनत करून सरपंच, ग्रामसेवक, संबंधित अधिकारी यांनी हेतुपुरस्सर बिल काढून शासनाची फसवणूक केली आहे. संंबंधितांकडून ही रक्कम वसूल करून निलंबनाची व फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार देत केली आहे.

संबंधित जागेवर शासनाचा शिक्का असला तरीही गेल्या अनेक वर्षांपासून मसणवटा म्हणून सातबारा उताऱ्यावर नोंद आहे. त्यामुळे या जागेत मूलभूत सुविधा योजनेंतर्गत स्मशानभूमी शेड व सुशोभिकरण करण्यासाठी कामे करण्यात आली आहेत.

अनिल जांभळे, उपअभियंता, बांधकाम विभाग, रोहा पं.स.
Exit mobile version