माथेरानमध्ये नियमबाह्य जंगलतोड सुरूच

पर्यावरणदृष्ट्या अत्यंत संवेदनशील क्षेत्र; नियमांना हरताळ फासून बेकायदेशीर बांधकाम

| नेरळ | प्रतिनिधी |

माथेरानच्या निसर्गावर घाला घालण्याचे प्रकार काही थांबण्याचे नाव घेत नाहीत. शहरातील अलेक्झांडर पॉइंट भागातील हॉटेल अलेक्झांडरमध्ये वन कायदा, माथेरान नियम या सर्वांची पायमल्ली सुरू आहे. तेथे मोठ्या प्रमाणात अतिरिक्त बांधकाम केले जात असून, झाडे प्रचंड प्रमाणात तोडण्यात आली आहेत. दरम्यान माथेरान नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते सीताराम कुंभार आणि नगरसेवक सचिन दाभेकर आक्रमक भूमिका घेतली असून, संबंधित बांधकामावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

माथेरान या पर्यावरणदृष्ट्या अत्यंत संवेदनशील व संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. माथेरान हे पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र घोषित असल्याने येथे नवीन बांधकामास परवानगी नसून केवळ जुन्या संरचनांच्या किरकोळ दुरुस्तीला अत्यंत कडक अटी व शर्तींनुसार परवानगी दिली जाते. अशा परिस्थितीत मॉनिटरिंग कमिटी व हेरिटेज कमिटीची आवश्यक मंजुरी न घेता अलेक्झांडर हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणावर बांधकाम सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

माथेरानमध्ये नियमांना हरताळ फासून बेकायदेशीर बांधकाम सुरू असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. येथील भूखंड क्रमांक एम पी 99 या अलेक्झांडर हॉटेलमध्ये मॉनिटरिंग कमिटी (सनियंत्रण समिती) आणि हेरिटेज कमिटीच्या पूर्वपरवानगीशिवाय अतिरिक्त व अनियमित बांधकाम सुरू आहेत. अशी लेखी तक्रार विरोधी पक्षनेते कुंभार आणि नगरसेवक दाभेकर यांनी माथेरान नगरपरिषदेकडे दिली आहे.

कुंभार यांच्याकडून करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, माथेरान नगरपरिषदेचे मुख्याधिकारी राहुल इंगळे यांनी दिनांक 26 सप्टेंबर 2025 अन्वये किरकोळ दुरुस्तीची परवानगी दिली. मात्र, ही परवानगी देताना मॉनिटरिंग कमिटी किंवा हेरिटेज कमिटीची मंजुरी घेण्यात आली नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. संबंधित परवानगीचा आधार घेत पावसाळ्यानंतर करण्यात येणाऱ्या किरकोळ दुरुस्तीच्या नावाखाली नवीन खोल्या वाढविण्याची तयारी सुरू असून, प्रत्यक्षात अतिरिक्त बांधकाम करण्यात येत असून त्याची मुदत ही संपली आहे आणि तरीदेखील बांधकामे सुरू आहेत.

नियमांचे उल्लंघन
हॉटेल परिसरात अनधिकृतपणे झाडे तोडण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. अलेक्झांडर हॉटेल परिसरालगत जंगल क्षेत्रामध्ये अनधिकृतपणे मोठे तंबू (टेंट) उभारण्यात आल्याने पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन झाले आहे.

अलेक्झांडर हॉटेल येथील बांधकाम त्वरित थांबवून ते तोडून टाकण्यात यावे तसेच या बांधकामाला आणि जंगलातील झाडे तोडणाऱ्या हॉटेल मालकावर गुन्हा दाखल करावा.

सीताराम कुंभार
विरोधी पक्षनेते
Exit mobile version