ठेकेदारावर कारवाईची मागणी; पाण्याची पातळी घटल्याने नागरिकांमध्ये चिंता
| महाड | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील महाड नगरपरिषदेच्या मालकीच्या ऐतिहासिक चवदार तळ्यातून बेकायदेशीररित्या पाण्याचा उपसा केल्याचा प्रकार समोर आला आहे. काही दिवसांपूर्वी सकाळच्या सुमारास धनंजय जाधव या खाागी ठेकेदाराने चार ते पाच पंपांच्या सहाय्याने तळ्यातील पाणी बाहेर काढल्याची माहिती स्थानिक नगरसेवकांनी मुख्याधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली.
सुमारे दोन तास चाललेल्या या पंपिंगमुळे तळ्यालगतच्या विहिरींच्या पाण्याची पातळी कमी झाल्याची चर्चा शहरात सुरू आहे. आधीच पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या महाडमध्ये या घटनेमुळे भविष्यात गंभीर टंचाई निर्माण होण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. नगरपरिषदेची कोणतीही परवानगी न घेता पाण्याचा उपसा केल्याचा आरोप होत असून, संबंधित ठेकेदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी काही नगरसेवकांनी केली आहे. दरम्यान, याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून, चौकशी सुरू असल्याची माहिती महाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांनी दिली. चौकशी अहवालाच्या आधारे संबंधित ठेकेदारावर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
