। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी धाराशिव येथील एकाला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून 18 लाखांच्या दारूसह 8 लाखांचा टेम्पो असा एकूण 26 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अमजद शेरखान पठाण (23), रा. येरमाळा ता. कळंब, जि. धाराशिव असे त्याचे नाव आहे. ही कारवाई मुंबई-गोवा महामार्गावर कसाल येथे राज्य उत्पादक शुल्कच्या भरारी पथकाकडून करण्यात आली. याबाबत अधिक माहिती अशी की, राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार मुंबई-गोवा महामार्गावर कसाल येथे वाहनांची तपासणी करत असताना मालवाहू टेम्पोमध्ये गोवा बनावटीची बेकायदा दारू आढळून आली.
याप्रकरणी अमजद शेरखान पठाण याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून गोवा बनावटीच्या दारूच्या विदेशी मद्याचे विविध ब्रँडचे 18 लाख रुपये किमतीचे 300 खोके जप्त केले, तर 8 लाखांच्या टेम्पोसह एकूण 26 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई अधीक्षक मनोज शेवरे, निरीक्षक शरद जाधव, दुय्यम निरीक्षक विशाल सरवटे, सहायक दुय्यम निरीक्षक गोपाळ राणे, जगन चव्हाण आदींच्या पथकाकडून केली. अधिक तपास दुय्यम निरीक्षक विशाल सरवटे करीत आहेत.
निवडणूकीची तोंडावर प्रशासन अॅक्शनमोडमध्ये आल्याचे दिसते.







