मत्स्यव्यवसाय विभागाची कारवाई
। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
दापोली तालुक्यातील बुरोंडीच्या समुद्रात दुसऱ्या मासेमारी बोटींना बेकायदेशीरपणे एलईडी लाईटचा पुरवठा करणाऱ्या एका बोटीवर मत्स्यव्यवसाय विभागाने गुरुवारी (दि. 24) रात्री कारवाई करत बोट जप्त केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अंमलबजावणी अधिकारी श्रीम. दीप्ती साळवी, सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (परवाना अधिकारी, दाभोळ) हे मध्यरात्रीच्या सुमारास बुरोंडीच्या समोर गस्त घालत होते. यावेळी नझीम अली जांभारकर (रा. पडवे, ता. गुहागर, जि. रत्नागिरी) यांच्या मालकीची साबीर ही नौका महाराष्ट्राच्या जलधी क्षेत्रात बुरोंडी समोर अनधिकृतपणे एलईडी लाईटचा वापर करताना आढळून आली. यावेळी या बोटीवर तांडेल आणि दोन खलाशी होते.
मत्स्यव्यवसाय विभागाने एलईडी लाईट वापरणाऱ्या या नौकेवर कारवाई केली असून नौका जप्त करून दाभोळ बंदरात ठेवली आहे. तसेच, बोटीतील एलईडी लाईट आणि ते पुरवणारी उपकरणे जप्त करण्यात आली आहेत.