| पनवेल | वार्ताहर |
पनवेल परिसरातील अनेक महत्त्वाच्या ठिकाणी शहरातील रस्त्यालगत, चौकांमध्ये आणि इतर मोक्याच्या ठिकाणच्या जागा चायनीजसह खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी बळकावल्याचे चित्र दिसून येत आहे. रात्र होताच रस्त्यावर फास्टफूड विक्रेते, चायनीज सेंटर यांच्या गाड्या लागत आहेत. पहाटेपर्यंत चालणार्या या हातगाड्यांवर होणार्या गर्दीत रस्तादेखील अडवला जात आहे. तसेच या ठिकाणी मद्यविक्रीसुद्धा करण्यात येत असल्याने अशा फेरीवाल्यांवर पोलिसांसह महापालिकेच्या पथकानेही कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.
महापालिका अधिकार्यांच्या उदासीनतेमुळे शहरात अनधिकृत फेरीवाल्यांचा शिरकाव झाला आहे. शहरातील, शहराबाहेरील व्यक्तींकडून दिवसा, रात्री हातगाड्या मांडून, पदपथावर ठाम मांडून व्यापार केला जात आहे. त्यात उघड्यावर खाद्यपदार्थ विकणार्यांचीही मोठी भर पडली आहे. रस्त्यांवरच सिलिंडर मांडून खाद्यपदार्थ शिजवून विकले जात आहेत. त्यामध्ये फास्टफूड, चायनीज, तसेच इतर खाद्यपदार्थ विक्रेत्यांचा समावेश आहे. यामुळे सिलिंडरच्या स्फोटाच्या, आगीच्या दुर्घटनेची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय उघड्यावर शिजवल्या जाणार्या अन्नपदार्थांमुळे आरोग्याचाही प्रश्न निर्माण होत आहे, त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी बेकायदा मद्य विक्रीसुद्धा सर्रास सुरु आहे. काही गाळ्यांमध्येसुद्धा चायनीज सेंटरमध्ये विनापरवाना मद्य विक्री होत असल्याने या चायनीज गळ्यावर राज्य उत्पादन शुल्क पथकाने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.