अलिबागमध्ये इथं चालतो अवैध मटका जुगार; कृषीवलच्या हाती पुरावा

| अलिबाग | प्रमोद जाधव |

अलिबाग शहरासह परिसरात राजरोसपणे अवैध मटका जुगाराचा धंदा सुरु आहे. हिरव्या कापडयाच्या आडोशाला हा धंदा चालु आहे. याबाबतचे पुरावे कृषीवलच्या हाती लागले असून आता पोलीस त्यांच्यावर काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

अनेकदा तक्रारी करुनही अलिबाग पोलिसांकडून या धंद्याकडे डोळेझाक केली जात आहे. त्यामुळे पोलिसांच्या कृपेमुळे हा धंदा जोरात सुरु असल्याची चर्चा सध्या रंगत आहे. तसेच अलिबाग पोलिसांचा या धंद्यावरील धाक कमी झाल्याचे चित्र समोर येऊ लागले आहे. दरम्यान, अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शैलेश सणस या अवैध धंद्यांवर कारवाई करतील का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

अलिबाग हे जिल्ह्याचे ठिकाण आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी पोलीस अधीक्षक कार्यालय असून पोलीस ठाणेदेखील आहे. अलिबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी, चोऱ्यांसारखे गुन्हे घडत असताना, गेल्या अनेक महिन्यांपासून या ठिकाणी मटका जुगाराचा धंदा राजरोसपणे सुरु आहे. अलिबाग शहराबरोबरच शहरानजीक असलेल्या परिसरात वेगवेगळया दुकानांचा आधार घेत आडोशाला हे धंदे सुरु आहेत. त्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकसमोर बिर्याणी दुकानाच्या बाजूला, भाजी मार्केट देशीबारच्या परिसरातील गल्लीत, मिरची गल्ली परिसर, रोहिदास नगर, शासकिय वसाहतीजवळ, चेंढरे बायपास, एसटी स्थानक, घरत आळी परिसर अशा अनेक भागात हे धंदे सुरु असताना अलिबाग पोलिसांची बघ्याची भुमिका असल्याचे चित्र आहे.

मटका जुगारामुळे अनेक कुुटुंब उध्वस्त होण्याची भिती असताना पोलीस याकडे दुर्लक्ष करीत असल्याने पोलिसांच्या या दुर्लक्षाबाबत नागरिकांकडून शंका उपस्थित केली जात आहे. अलिबाग शहरात व परिसरात सुुरू असलेल्या या धंद्याचे खरे सुत्रधार ग्रामीण भागातील असल्याची माहितीदेखील समोर येत आहे. शिरवली, मिळकतखार, मानी आदी परिसरातील हे सुत्रधार आहेत. याची माहिती अलिबाग पोलिसांना असूनही ते दुर्लक्ष करीत आहेत. या अवैधधंद्यावर रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे लक्ष देतील का, असा सवाल उपस्थित केली जात आहे.

Exit mobile version