| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील रेवदंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोर्लीपासून वावे परिसरात खुलेआम मटकाधंदा तेजीत सुरू आहे. रेवदंडा पोलीसांच्या दुर्लक्षामुळे हा धंदा चालत असल्याच्या तक्रारी वाढत आहे.
बोर्लीपासून वावे परिसरात दिवसेंदिवस नागरिकीकरण झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे या भागाला एक व्यवसायिकदृष्ट्या महत्व प्राप्त सुरु झाले आहे. रेवदंड्या बरोबरच वावे, बोर्ली येथील बाजारपेठ नावारुपाला येऊ लागली आहे. या परिसरात लहान मोठे व्यवसाय सुरु आहेत. वैद्यकीय व्यवसायापासून कपडे, ताडीमाडी, बिअर शॉप तसेच खाद्य पदार्थांची दुकाने या परिसरात वाढू लागली आहेत. वाढत्या नागरिकीकरणामुळे नागरिकांसह मालमत्तेची सुरक्षादेखील महत्वाची ठरत आहेत. रेवदंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारीवर अंकूश ठेवण्यासाठी पोलीस ठाण्यातील प्रत्येक पोलीस कर्मचार्यांकडे गावे वाटून दिली आहेत. या गावांमध्ये पोलीस दर दिवशी अथवा दोन ते तीन दिवसांनी फेरी मारत असतात. तरीदेखील या बोर्लीपासून वावे परिसरात मोकाटपणे मटक्याचा धंदा सुरु आहे. रेवदंडा पोलिसांनी याबाबत माहिती देखील कारवाई करण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याच्या तक्रारी दबक्या आवाजात सुरु आहेत.
बोर्लीपासून वावे परिसरात मटका चालविणारा हा मुळचा रेवदंडा परिसरातील आहे. त्याचे सतत मुंबईमध्ये येणे जाणे असते. आठवड्यातील काही दिवस तो रेवदंडा परिसरात असतो. ही माहिती पोलीसांना असूनदेखील रेवदंडा पोलीस कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याने नाराजीचे सुर उमटत आहे. वादाच्या भोवर्यात सापडलेले रेवदंड्याचे नवे पोलीस निरीक्षक अतिग्रे या अवैध धंद्यावर अंकूश ठेवण्यास यशस्वी ठरतील का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याबाबत पोलीस निरीक्षक अतिग्रे यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.