कुरुळ गावावर उपासमारीचं संकट

कोकणबार्ज कंपनीकडून अवैध उत्खनन; ग्रामस्थांचे तहसिलदारांना निवेदन, शेकापचा पाठिंबा
| अलिबाग | प्रतिनिधी |
खाडीतून मिळणाऱ्या शिवल्या, तिसऱ्यांची विक्री करुन कुरुळ गावातील महिला अनेक वर्षापासून कुटुंबाचा निर्वाह तसेच मुलांचं शिक्षण करीत होत्या. मात्र आता खाडीवर अवलंबून असलेलं हे गाव संकटात सापडलं आहे. कोकणबार्ज प्रा. लि. कंपनीकडून होणाऱ्या अवैध खोदकाम व कांदळवनाच्या तोडीमुळे कुरुळ गावावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे आमचा रोजगार वाचवा, असं गाऱ्हाणं कुरुळमधील महिलांनी तहसलिदारांकडे मांडलं.

याबाबत कुरुळ ग्रामस्थांनी सोमवारी (दि. 9) तहसिलदार विक्रम पाटील यांना निवेदन दिले. यावेळी सरपंच ऍड. सुलभा पाटील, शेकापचे सदस्य तथा युवा नेते अवधूत पाटील, अभिजीत घाडगे, रंजना पाटील, मीनाक्षी घाडगे, वैजयंती पिंगळे, कमळी पाटील, भाग्यश्री पाटील, विद्या पाटील, रश्मी पाटील आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कुरुळ गावालगत खाडी असून गेली 60 वर्षे गावातील महिला शिवल्या, कालवे आदी मच्छिमारी करुन कुटुंबाचे उदरनिर्वाह करीत आहेत. मात्र या खाडीलगत कोकणबार्ज प्रा. लि. या कंपनीच्या माध्यमातून मोठ-मोठी जहाजे बनविली जात आहेत. खाडीच्या क्ष्ामतेपेक्षा मोठ्या जहाजांची या भागातून ने-आण केली जात आहे. याबाबत कंपनीने ग्रामस्थांना विश्वासात न घेता कांदळवनाची तोड करुन सुमारे 1500 ब्रास वाळू मिश्रित रेतीचे उत्खनन केल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले आहे.

वाळू मिश्रित रेतीमध्येच तिसऱ्या व कालव्यांचे नैसर्गिकरित्या उत्पादन होते. मात्र उत्खननामुळे उत्पादनात घट होत आहे. भविष्यात असेच उत्खनन सुरु राहिल्यास परिसरातील सुमारे 200 कुटुंबावर उपासमारीचं संकट घोंगावणार असल्याची भीती यावेळी ग्रामस्थांनी तहसिलदारांकडे व्यक्त केली.

या प्रकरणात प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी, अन्यथा उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. तसेच दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्याची जबाबदारी प्रशासनाची असेल, असंही ग्रामस्थांकडून सांगण्यात आले.

याच व्यवसायातून मुलीचे शिक्षण पुर्ण केले
भरती ओहोटीचा अंदाज घेऊन नोव्हेेंबर ते जूलै या आठ महिन्याच्या कालावधीत गेल्या अनेक वर्षापासून खाडीतून शिवल्या, कालवे काढण्याचे काम करीत आहे. शिवल्या कालवे स्थानिकांसह पर्यटकांना आवडतात. त्यामुळे त्यांना मागणी प्रचंड आहे. यातून महिलांना रोजगार मिळत आहे. याच रोजगारातून मुलीला वैद्यकिय शिक्षण दिले आहे. मात्र कोकणबार्ज कंपनी आमचा रोजगारच हिसकावून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. याला आमचा कायम विरोध आहे. अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल असे, रश्मी पाटील यांनी सांगितले.

शेकापचा पाठिंबा
रविवारी दुपारी असंख्य महिलांनी शेकापचे सरचिटणीस आ. जयंत पाटील, महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांची भेट घेऊन त्यांच्याकडे गाऱ्हाणे मांडले. महिलांच्या रोजगारावर गदा आणण्याचा घाट घालणाऱ्या कंपनीविरोधात आमदार जयंत पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. व महिलांच्या पाठीशी आहोत असा निर्वाळा दिला. दरम्यान चित्रलेखा पाटील यांनीदेखील महिलांशी चर्चा करून त्यांना लवकरात लवकर न्याय मिळावा अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे.

खाडीतून मिळणारे कालवे, शिंपल्या विकून आम्ही उदरनिर्वाह चालवित आहोत. मात्र ही खाडी बुजविण्याचा प्रयत्न कंपनीकडून होत आहे. त्यामुळे आम्ही तहसीलदार यांची भेट घेऊन हा प्रश्न सोडविण्यासाठी आलो. त्यांना निवेदन दिले आहे.

भाग्यश्री पाटील
Exit mobile version