राकेश खराडे यांचा आंदोलनाचा इशारा
| रसायनी | प्रतिनिधी |
पाताळगंगा एमआयडीसी परिसरातील मुख्य रस्त्यांवर ट्रक, ट्रेलर, कंटेनर आणि इतर अवजड वाहनांचे सर्रास बेकायदेशीर पार्किंग सुरू असून, संबंधित यंत्रणांच्या दुर्लक्षामुळे हा परिसर ‘अपघाताचा सापळा’ बनला आहे. नियमांना हरताळ फासत मुख्य रस्त्यावरच वाहने उभी केली जात असल्याने रस्त्याची रुंदी मोठ्या प्रमाणात कमी झाली असून, वाहतुकीचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे. या बेकायदेशीर पार्किंगमुळे समोरून येणारी वाहने दिसत नसल्याने कोणत्याही क्षणी भीषण अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हजारो कामगार, दुचाकीस्वार, शालेय विद्यार्थी, महिला व पादचारी यांना दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. औद्योगिक क्षेत्रातील महत्त्वाच्या रस्त्यांवर अशी परिस्थिती असतानाही संबंधित विभागांकडून ठोस कारवाई होत नसल्याने महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे कोकण विभाग अध्यक्ष राकेश खराडे यांनी रसायनी पोलीस ठाणे तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ पाताळगंगा रसायनी यांना लेखी निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला आहे.
