अवजड वाहनांच्या बेकायदा रांगा

| पनवेल । वार्ताहर ।
मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम संथगतीने सुरू आहे. त्यामुळे पळस्पाफाटा ते कर्नाळाखिंड दरम्यान महामार्गावरच अवजड वाहने उभी केली जात असल्याने अपघातांचा धोका वाढला आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाच्या पहिल्या टप्प्यात पळस्पे ते इंदापूर या मार्गाचे रुंदीकरणाचे काम सध्या सुरू आहे. या मार्गावर पळस्पे, चिंचवन, शिरढोण आदी गावांचा समावेश आहे. गावांलगत मोठमोठे गोदाम असून, मालवाहतूक करणार्‍या अवजड वाहनांची दिवसभर वर्दळ असते. ही वाहने रस्त्यावर उभी करण्यात येत असल्याने स्थानिकांची गैरसोय होत आहे. रहदारीसाठी रस्ता अपुरा पडतो.

शिवाय अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. पळस्पेतील जेडब्ल्यूसी कंपनीजवळ असलेल्या सर्व्हिस रोडवर दररोज दोन्ही बाजूस अवजड वाहने उभी असतात. विशेष म्हणजे, या ठिकाणी असलेल्या आदिवासीवाडी तसेच गावकर्‍यांना या वाहनांचा अडथळा निर्माण होतो. मात्र, वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे या ठिकाणी चालकांकडून सर्रास अवजड वाहने उभी केली जातात. त्यामुळे रस्त्यालगत होणार्‍या पार्किंगवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

लहान वाहनांचे सर्वाधिक अपघात
मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम संथगतीने सुरू आहे. त्यामुळे वाहनचालकांना विशेष खबरदारी घ्यावी लागत आहे. अशातच महामार्गावरील गावांलगतच्या सेवा रस्त्यांवर अवजड वाहनांचे बेकायदा पार्किंग करण्यात येत असल्याने लहान वाहनांच्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर सध्या रस्ते दुरुस्तीचे काम सुरू आहे. याच अनुषंगाने काही ठिकाणी गावांलगत पार्किंग केले जात आहे. पण यामुळे रहदारीला अडथळा येत असल्याने अशा वाहनांवर दररोज कारवाई करण्यात येत आहे. – सुधाकर ढाणे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, नवीन पनवेल, वाहतूक शाखा

Exit mobile version