| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल तालुक्यातील मानघर येथील एका शेतघरात बेकायदेशीरपणे हुक्का विक्री सुरू असल्याचा प्रकार पनवेल शहर पोलिसांनी उघडकीस आणला. या प्रकरणी सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला. या शेतघरातून घटनास्थळावरून हुक्का ओढण्यासाठी वापरली जाणारे विविध साहित्य जप्त करण्यात आले.
पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मानघर गावातील एका शेतघरात हुक्का पार्लर चालविला जात असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे शहर पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय देवकाते यांच्या पथकाने धाड टाकली. यावेळी पोलिसांना शेतघराचा मालक, व्यवस्थापक तसेच वेटर मिळून सात जण आढळून आले. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत या सात जणांविरोधात कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान आठ मोठे काचेचे हुक्का कुंभ, दहा पाइप तसेच विविध चवींचे चिकट पदार्थ असलेले डबे जप्त केले आहेत. दरम्यान, शेतघर भाड्याने देणाऱ्या मालकांना यापूर्वीही पोलिसांनी बैठका घेऊन हुक्का विक्री किंवा अमली पदार्थ सेवनास परवानगी देऊ नये, अशा सूचना दिल्या होत्या. मात्र, त्या सूचनांचे पालन न केल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
शेतघरात बेकायदेशीरपणे हुक्का विक्री सुरू
