अवैध रेती उत्खननाविरोधात कोपरवासियांचा एल्गार

महसूल प्रशासनाची ‘बोटचेपी’ भूमिका
। धाटाव । वार्ताहर ।
जिल्ह्यातील अनेक खाडीत अवैध रेती उत्खनन सुरूच आहे. कुठलीही परवानगी नसताना अवैध रेती उत्खनन होतेच कशी? अशी चर्चा सबंध जिल्ह्यात पुन्हा सुरू झाली. दुसरीकडे जिल्हा मुख्यत: रोहा महसूल प्रशासनाच्या नेहमीच्या बोटचेपी भूमिकेने रेती ठेकेदारांनी अक्षरश: कहरच केल्याचे समोर आल्याने एकच खळबळ उडाली.

रेती ठेकेदार अवैध सक्शनचा वापर करून थेट कोपरी महसूल नोंदीतील करंजवीरा हद्दीत शिरले आणि शेकडो ब्रास रेतीचे उत्खनन केले. संबंधित तलाठी, वनविभागाचे अधिकारी यांचे लक्षात न आल्याने आश्‍चर्य व्यक्त झाले. अवैध रेतीच्या उत्खननाने शेकडो कांदळवनाची झाडे उद्ध्वस्त झाली. बांधबंदिस्ती फोडल्याने एकमेव पिण्याच्या पाण्याच्या तलावात खारे पाणी शिरले, हे गंभीर प्रकरण अखेर ग्रामस्थांनी उघडकीस आणले. रेती ठेकेदारांवर कठोर कारवाई करावी, सक्शन पंप जप्त करावेत, असे म्हणत ग्रामस्थांनी थेट मुख्यमंत्री, पर्यावरणमंत्री यांसह जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना निवेदन दिले.

रोहा तालुक्यातील बहुतेक खाडीत पावसाळया अगोदर रेती ठेकेदारांनी अवैध रेती उत्खनन सुरू केले. दक्षिण खोर्‍यात मोठ्या प्रमाणात रेती उत्खनन झाल्याने बांधबंधिस्ती फुटली. खारे पाणी शेतात घुसत असल्याने शेकडो एकर जमीन नापीक झाली. पिण्याच्या पाण्याचे स्रोत खारे झाले. अवैध रेती उत्खननाकडे स्थानिक तलाठी, सर्कल अधिकार्‍यांनी नेहमीच कानाडोळा केला. हजारो कांदळवनाची कत्तल झाली. याकडे संबंधीतांनी कधीच लक्ष दिले नाही. स्थानिक ग्रामस्थांच्या निवेदनाकडे प्रांत, तहसिल प्रशासन कायम दुर्लक्ष करीत केले, याच बोटचेपी भूमिकेतून दक्षिण खोर्‍यातील कोपरी गावाच्या हद्दीत रेती ठेकेदारांनी मोर्चा वळवत शेकडो ब्रास शेतीचे उत्खनन केले.

रेतीच्या हव्यासाने पिण्याच्या पाण्याच्या तलावाचे बांधबंधिस्तीही फोडले, हे समजताच कोपरी ग्रामस्थ कमालीचे आक्रमक झाले.याबाबत जिल्हाधिकारी रायगड यांची भेट घेऊ, रोहा महसूल प्रशासन नेहमीच बोटचेपी भूमिका घेतो, याची माहिती देऊन नेमके काय गौडबंगाल चालले आहे, हे समोर आणू अशी प्रतिक्रिया घाग यांनी दिली. अवैध रेती उत्खनन प्रकरणावर पो. निरीक्षक संजय पाटील यांनी सोमवारी तहसीलदार रोहा यांची भेट घेऊन कारवाई बंदोबस्ताबाबत आपण चर्चा करू असे दूरध्वनीवरून सांगितले.मुंबईकर मंडळींनी आ.आशिष शेलार यांची भेट घेतली आणि स्थानिक प्रशासनावर दबाव वाढले. रेती ठेकेदारांनी कोपरी हद्दीतील खाडीत रेती उत्खनन करून मोठे नुकसान केले.एल्गार आंदोलनात सरपंच अश्‍विनी मोरे, रामचंद्र मोरे, बबन मोरे, लक्ष्मण मोरे, मोरेश्‍वर मोरे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते

पिण्याच्या पाण्याची नासाडी
रेती ठेकेदारांनी कोपरी हद्दीत अक्षरशः हैदोस घातल्याचे समोर आले. पिण्याच्या पाण्याची नासाडी केली, बांधबंदिस्त फोडले. हजारो कांदळवन उद्ध्वस्त केले. पिण्याच्या पाण्याचे तलाव खारट केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.

Exit mobile version