रोह्याच्या जंगलात खैराची अवैध कत्तल

तस्करांविरोधात कडक कारवाईची मागणी

। धाटाव । वार्ताहर ।

मुरुड वनक्षेत्रपाल हद्दीतील तालुक्याच्या चणेरा जंगल भागात खैर तस्कर पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. महिनाभरापूर्वीच रोह्यातील खैराच्या झाडांची तोड करुन तस्करी करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा खांबेरे जंगलात अवैध तोड उघडकीस आली आहे. वनाधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे खैर तस्कारांचे फावले असून, वारंवार खैराची कत्तल आणि तस्करी सुरू असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमी नागरिकांमधून केला जात आहे. तस्करांविरोधात कडक कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता शहानवाज मुकादम यांनी केली आहे.

मुरुड वनक्षेत्रपाल हद्दीत मोठा प्रमाणात झाडांची कत्तल होत असल्याचे अनेकदा समोर येऊनही वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी कठोर कारवाई करण्यात नेहमीच कुचराई करतात, असा आरोप करण्यात येत आहे. चणेरा विभागातील खांबेरे हद्द जंगलात मोठ्या प्रमाणात खैर झाडांची तोड करून तस्करी करण्याची घटना समोर आल्याने वनाधिकाऱ्यांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष नाही ना, सर्वच जंगल बोडके करण्याचा इरादा आहे की काय, असा सवाल आता सामान्यांनी, वनप्रेमींनी उपस्थित केला आहे.

चणेरा विभागातील खांबेरे हद्दीच्या पांगळोली जंगलात अवैधपणे खैराची तोड मोठ्या प्रमाणात सुरू आहे. लाकडांची तस्करी करून मातीमोल किमतीत विकली जातात, हे अनेकदा उघड झाले, तशा तक्रारी वनपाल, वनक्षेत्रपाल यांच्याकडे झाल्या, पण तक्रारींकडे कोणीच लक्ष देत नाही. त्यामुळे खैर चोरट्यांचे बळ अधिक वाढले. विविध झाडांची मुख्यत: खैराच्या अवैध तोडीने जंगल बोडके होत आहे, इतर झाडांचीही कत्तल सुरूच आहे. याउलट, जंगल तोडीला वनविभागातील अधिकारीच कारणीभूत आहेत, त्यांचा वचक राहिला नाही, आर्थिक संबंधातून खैर चोरी अविरत सुरू आहे, असा आरोप मुकादम यांनी केला. रविवारी रात्रीच्या सुमारास खांबेरे हद्दीतील झाडे तोडून रातोरात वाहतूक करण्याचा इरादा पोलिसांनी अप्रत्यक्ष हाणून पाडला. गणेशोत्सवानिमित्त ठेवण्यात आलेल्या बंदोबस्तामुळे हा डाव उघडकीस आला. स्थानिक दलालाच्या मदतीने हे सर्व सोपस्कार चालू होते, त्याला वनविभागातील काही वनपालांचा वरदहस्त होता, अशी चर्चा आहे. याच गंभीर घटनाची दखल घेत मंगळवारी मुरुड वनक्षेत्रपाल प्रियांका पाटील यांनी खांबेरे हद्दीतील अवैध खैर जप्त केला. मुळात, खैर तोड व तस्करी झाली नाही, ही वरिष्ठांना वनपालांनी दिलेली माहिती खोटी ठरली, हे समोर आल्याने नेमके गौडबंगाल काय, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

खैर तोड व तस्करी झाली नाही, नंतर खैराची बेमालूम तोडलेली झाडे आढळून आली, याचा अर्थ काय, याचे उत्तर आता वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी द्यावे, अशी मागणी आता जोर धरत आहे. स्थानिक दलालामार्फत खैराची लाकडे विकत घेणारा व्यापारी महाड येथील असल्याची दबकी चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे. विभागाने त्या दलाल व्यापाराचा शोध घेऊन गुन्हा दाखल करावा, अशी मागणी होत आहे. दरम्यान, मुरुड हद्द वनविभागाच्या वनक्षेत्रपाल प्रियांका पाटील याबाबत नेमकी काय कारवाई करतात, त्या कितपत प्रामाणिकपणा दाखवतात, खांबेरे खैर तस्करी प्रकरणाची वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी काय दखल घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तर, संबंधित खैर चोरट्यांवर कारवाई न केल्यास आपण आंदोलनात्मक पातळीवर भूमिका घेऊ, असे मुकादम यांनी ठणकावून सांगितल्याने आता काय होते? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Exit mobile version