शहराला अवैध भरावाचा विळखा

पेणमध्ये मातीमाफियांचा धुडगूस; नैसर्गिक नाल्यांवर अतिक्रमण

| पेण | प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण म्हणून पेण शहराकडे पाहिले जाते. त्यामुळे पेणमध्ये शहरीकरणाचा वेग वाढल्याने शहराच्या भोवती मोठ्या प्रमाणात शेतीमध्ये भराव होत असलेला पहायला मिळतो. मात्र, हा भराव अवैधरित्या चोरी छुपे सुरू असल्याचे समोर येत आहे. महसूल विभागाचा मातीमाफियांवर वचक नसल्याने सर्रास स्वामित्व कर न भरता मातीचे उत्खनन व भराव सुरू असल्याची चर्चा आहे.

पेण शहराच्या सभोवताली बोरगाव रोड, तरणखोप रोड, वाशी नाक्याच्या पुढे खुलेआम मोठमोठाली भराव झालेले पहायला मिळतात. परंतु, स्थानिक तलाठ्यांना हे दिसत नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात आहे. आजच्या घडीला मोठ्या प्रमाणात महसूल बुडवणाऱ्यांचे प्रमाण वाढत चाललेले आहे. याला सर्वस्वी महसूल खात्याचे अधिकारी व कर्मचारी जबाबबदार आहेत. महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांचा धाक उरला नसल्यानेच खुलेआम पेण शहराच्याभोवती भराव सुरू आहेत. त्यातच नियमबाह्य भराव करत असताना नैसर्गिक नालेदेखील भरावात बंद केले जातात, त्यामुळे पावसाळ्यात याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसतो. त्याचा ताण आपत्कालीन व्यवस्थेला सहन करावा लागतो. असे असतानादेखील महसूल खाते या बाबीकडे दुर्लक्ष करत आहे, असा आरोप पेणकरांकडून करण्यात येत आहे.

पेण तालुक्यात होणारे अवैध उत्खनन व भरावावर कायदेशीर कारवाई केली जाईल. मी पेणचा कार्यभार घेऊन आठच दिवस झालेले आहेत, त्यामुळे थोडा वेळ माहिती घेण्यास जाणार. परंतु, अवैध भरावावर कायदेशीर कारवाई करून स्वामित्व कर दंडाच्या स्वरूपात नियमाने भरून घेतला जाईल.

तानाजी शेजाळ, तहसीलदार
Exit mobile version