ब्लॉगच्या बिघाडाचा शेतकऱ्यांवर परिणाम

| अलिबाग | प्रमोद जाधव |

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोबाईलच्या एका क्लीकवर खतांची माहिती घरबसल्या मिळावी यासाठी जिल्हा परिषद कृषी विभागाने एक ब्लॉग तयार केला होता. परंतु, ‌‘नव्याचे नऊ दिवस’ या उक्तीप्रमाणे जिल्हा परिषद कृषी विभागाचा कारभार समोर आला आहे. तांत्रिक बिघाडामुळे ब्लॉगमार्फत मिळणारी सेवा बंद झाली आहे. त्याचा परिणाम शेतकऱ्यांना खतांची माहिती मिळण्यास विलंब होत आहे.

खतांचा साठा नाही, खत संपले, खत आलेच नाही, अशा अनेक कारणांमुळे शेतकऱ्यांना ऐन हंगामात खतांपासून वंचित राहावे लागते. खत वेळेवर न मिळत नसल्याने भात व अन्य पिकांच्या उत्पादनावर त्याचा परिणाम होतो. शेतकऱ्यांची ही समस्या कायमची सोडविण्यासाठी जिल्हा परिषद कृषी विभागाने वर्षभरापूर्वी आधुनिक साधनाचा वापर करीत https://raigadfert1.blogspot.com/2022 ब्लॉग तयार केला. या ब्लॉगद्वारे 265 कृषी सेवा केंद्रात कोणत्या खतांचा पुरवठा आहे, ही माहिती मोबाईलवर घरबसल्या मिळू लागली. परंतु, सध्या या ब्लॉगमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे. नियमित होणारे अपडेट होण्यास अडथळे निर्माण होत आहेत. त्याचा परिणाम शेतकऱ्यांना आता खतांची माहिती घेण्यासाठी प्रत्यक्षात खत विक्री केंद्रात वणवण करावी लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ वाया जाण्याबरोबरच आर्थिक झळही बसत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

ब्लॉगबाबत शेतकरी अनभिज्ञ
खतांची माहिती मोबाईलवरून सहज उपलब्ध व्हावी यासाठी कृषी विभागाने ब्लॉग तयार केला आहे. या ब्लॉगची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कृषी विभागाने प्रयत्न सुरू केले. मात्र, आजही काही शेतकरी या ब्लॉगबाबत अनभिज्ञ असल्याचे समोर येऊ लागले आहे.

ब्लॉगच्या तांत्रिक बिघाडामुळे शेतकऱ्यांना खतांची नियमित माहिती मिळत नाही. ब्लॉग अपडेट होण्यास अडथळे निर्माण होत आहे. दुरुस्ती करण्याचे काम सुरु असून, त्यानंतर ब्लॉग सुरु होईल.

मिलिंद चौधरी, कृषी विकास अधिकारी, रायगड जिल्हा परिषद

या ब्लॉगबाबत आम्हा शेतकऱ्यांपर्यंत माहितीच पोहोचलेली नाही. त्यामुळे ब्लॉग प्रकार नक्की काय आहे, हेच माहिती नाही.

प्रभाकर नाईक, शेतकरी
Exit mobile version