सर्वत्र ढगाळ वातावरण; समुद्र खवळला
| रायगड | वार्ताहर |
मान्सूनचे आगमनास अद्याप वेळ असला, तरी पश्चिम बंगालच्या उपसागरात घोगावणार्या ‘रेमल’ चक्रीवादाळाचा प्रभाव कोकण किनारपट्टीवर दिसून येत आहे. रविवारी सायंकाळपासून सर्वत्र ढगाळ वातावरण असून लाटांचाही वेग वाढला आहे. समुद्राच्या पाण्याचा रंग बदलत आहे.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अलर्टनुसार ‘रेमल’ चक्रीवादळ बांगलादेशातील खेपूपारा आणि मोंगलादरम्यान जमिनीवर धडकणार आहे. वार्याचा वेग ताशी 110 ते 135 किमी असेल, असा अंदाज आहे. या चक्रीवादळाने मान्सूनचा वेग वाढणार आहे. महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्यास आठवडाभरापेक्षा जास्त कालावधी लागेल, मात्र त्याआधीच ढग दाटून आल्याने मान्सून सक्रिय झाल्याचा अनुभवास येत आहे. सध्याचे वातावरण बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे बदलत असल्याचे येथील मच्छीमारांचे म्हणणे आहे. मासेमारीचे शेवटचे दिवस असल्याने मच्छीमार समुद्रात गेले होते. 1 जूनपर्यंत शक्य तितका नफा मिळवण्याचा प्रयत्न करणार्या मच्छीमारांना बदलत्या वातावरणामुळे किनारा गाठावा लागला आहे. यंदाच्या हंगामाचा शेवट खूपच खर्चिक झाल्याचे अलिबागमधील मच्छीमार सत्यजित पेरेकर यांनी सांगितले. शेवटच्या पंधरा दिवसांत बोटीवर काम करणार्या कामगारांचाही पगार काढण्यासाठी पदरमोड करावी लागली, असे मच्छीमारांचे म्हणणे आहे.







