निवडणुकीचा पर्यटन व्यवसायावर परिणाम

श्रीवर्धन समुद्रकिनारी पर्यटकांअभावी शुकशुकाट

| श्रीवर्धन | वार्ताहर |

एप्रिल व मे महिन्यामध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्यात येणार आहेत. काही भागात पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्णदेखील झाले आहे. तर, एप्रिल महिन्याच्या अखेरीला व मे महिन्यात उर्वरित मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. निवडणुका जाहीर झाल्याने पर्यटकांनी कोकणात येण्याकडे पाठ फिरवल्याचे पाहायला मिळत आहे. प्रत्येक शनिवारी व रविवारी श्रीवर्धन पर्यटकांनी भरून जाते. तर, श्रीवर्धनच्या समुद्रकिनार्‍यावर देखील पर्यटकांची खूप मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते. परंतु सध्या श्रीवर्धन समुद्रकिनारी अक्षरशः शुकशुकाट पाहायला मिळत आहे.

वॉटर स्पोर्ट्स, घोडागाडी, सेंड बाईक, उंटवाले त्याचप्रमाणे खाद्यपदार्थांचे स्टॉलवालेदेखील पर्यटक नसल्यामुळे समुद्रकिनारी नुसतेच बसून असल्याचे चित्र आहे. राज्यातील बहुतेक शाळांच्या परीक्षा संपून आता सुट्ट्या चालू झाल्या आहेत. परंतु, निवडणुकीचे वारे सगळीकडे वाहात असल्यामुळे नागरिकांनी फिरायला जाण्यासाठी सध्या तरी पसंती दिलेली नाही. नाहीतर शाळांना सुट्ट्या जाहीर झाल्यानंतर शनिवार, रविवार वगळता श्रीवर्धनमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पर्यटक आलेले पाहायला मिळायचे. निवडणुकीचा निकाल 4 जूनला लागणार आहे. तोपर्यंत पर्यटन व्यावसायिकांची अशीच स्थिती राहिल्यास यावर्षीचा पूर्ण हंगाम वाया गेला असेच म्हणावे लागेल. कारण, जूनच्या पहिल्या आठवड्यात कोकणामध्ये पाऊस पडायला सुरुवात होते. पाऊस सुरू झाल्यानंतर पर्यटक या ठिकाणी अत्यल्प प्रमाणात येतात. त्यामुळे निवडणुकीचा परिणाम पर्यटन व्यवसायावर झाला आहे, असेच म्हणावे लागेल.

Exit mobile version