| अमरावती | प्रतिनिधी |
भाजपा ही आता भारतीय जनता पार्टी राहिलेली नाही तर पाकिस्तान जनता पार्टी झाली आहे. प्रभू श्रीरामांना भाजपाच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी भाजपा मुक्त राम आंदोलन छेडणार असून महाराष्ट्रातून त्याची सुरुवात होईल असा घणाघाती हल्ला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज यवतमाळ येथे केला.
यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील शिवसैनिकांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटात गेलेले खासदार संजय देशमुख यांच्यावर सडकून टीका केली.
सभेच्या सुरुवातीलाच उद्धव ठाकरे यांनी उपस्थित शिवसैनिकांचे आभार मानत भावनिक संवाद साधला. पावसाळ्यात झाडांवर नवी पालवी फुटते तसाच हा माझ्या आयुष्यातील पावसाळा आहे. काही सडलेली पान गळून गेली पण नव्या जोमाने उभे राहणारे कट्टर शिवसैनिक हीच शिवसेनेची खरी ताकद आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
खासदार संजय देशमुख यांचा नामोल्लेख टाळत उद्धव ठाकरे म्हणाले, “शिवसेना प्रमुखांचा चेहरा आणि माझ्या शब्दावर विश्वास ठेवून तुम्ही ज्याला निवडून दिलं त्यानेच गद्दारी केली. त्यामुळं सर्वप्रथम माझे कर्तव्य आहे की यवतमाळ वाशिमच्या जनतेची मी माफी मागावी. तुम्ही त्याच्या बोटावर मतदानाची शाई लावली पण त्यानं तुमच्या विश्वासालाच काळं फासलं.”
शिंदे गटावर निशाणा साधताना त्यांनी उपरोधिक भाषेत टीका केली. आधी आमदारांचा भाव 50 खोके होता मग खासदारांचा किती असेल निवडून यायचं, स्वतःचा भाव वाढवायचा आणि नंतर विकून जायचं हा त्यांचा उद्योग झाला, असा टोलादेखील उद्धव ठाकरे यांनी लगावला.
लोकसभा निवडणुकीचा संदर्भ देत उद्धव ठाकरे म्हणाले, मोदींची लाट असल्याचा दावा करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावं की, महाराष्ट्रानं भाजपाला रोखलं आणि शिवसेनेचे खासदार निवडून दिलं. जर मोदींच्याच नावावर निवडून येत असाल तर पक्षांतर करण्याची गरज काय होती? असा सवालदेखील उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.






