रस्त्याच्या दुरावस्थेचा पर्यटनावर परिणाम

| कोर्लई | वार्ताहर |

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व नववर्षाच्या स्वागतासाठी मुरुड नगरी सज्ज झाली असून गेल्या चार दिवसांपासून साळाव -मुरुड रस्त्यावर पर्यटनात मोठ्या प्रमाणात वर्दळ दिसून येत असून बोर्ली, काशिद बीच तसेच नांदगाव बाजारपेठेत वाहनांच्या रांगा लागल्याने वाहतुक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. पर्यटन स्थळांवर पोहचण्यासाठी असणार्‍या रस्त्यांची झालेली दुरवस्था व वाहतुक कोंडीमुळे पर्यटकांची मोठी गैरसोय होत आहे.

नवर्षानिमित्त पुणे-मुंबईसह महाराष्ट्रातील निरनिराळ्या ठिकाणच्या पर्यटकांची पावले आता जिल्ह्यातील पर्यटन स्थळांकडे वळतील. जिल्ह्यातील विविध समुद्र किनारे व पर्यटन स्थळांवर गर्दी वाढू लागली आहे. येथील समुद्र किनारे, मंदिरे, ऐतिहासिक वास्तु, किल्ले, तीर्थक्षेत्र पाहण्यासाठी पर्यटकांसह शाळकरी व महाविद्यालयीन सहली व विदयार्थ्यांचा ओघ प्रचंड आहे. यामुळे पर्यटनावर अवलंबून असलेले हॉटेल व्यावसायिक, खानावळी, दुकानदार यांची सध्या चलती आहे. मात्र रस्त्याची झालेली दुरवस्था आणि वाहतूक कोंडीमुळे पुरते हैराण झाले आहेत. वाहतूक कोंडीमुळे पर्यटकांना तासंतास खोळंबून राहावे लागते. तसेच इच्छितस्थळी पोहचण्यास देखील उशीर होतो.

तसेच ठिकाणी रस्त्यांची कामे अपूर्ण अवस्थेत सुरु आहेत. परिणामी येथे येणार्‍या पर्यटकांना खाचखळगे, खड्डे, अरुंद मार्ग आणि वारंवार होणारी वाहतुक कोंडी अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे फटका पर्यटन व्यवसायाला देखील बसत आहे. खराब रस्ते व वाहतूक कोंडी यामुळे असंख्य पर्यटकांनी जिल्ह्याकडे पाठ फिरवलेली पाहायला मिळत आहे. परिणामी येथील पर्यटन व्यवसायावर संकट ओढवले आहे. त्यातच पर्यटन महोत्सवावर लाखोंची उधळण करीत असताना साळाव -मुरुड रस्त्याचा विचार विशेष बाब म्हणून लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतला असता तर पर्यटन महोत्सवाचा आनंद द्विगुणित झाला असता अशा प्रतिक्रिया जनमानसातून उमटत आहेत.

Exit mobile version