आदिवासींच्या उपजीविकेवर घाला?

माथेरानमध्ये ‌‘सुशोभीकरणा’च्या नावाखाली स्टॉल हटवण्याचा आरोप

| नेरळ | प्रतिनिधी |

जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माथेरानमध्ये आता स्थानिक आदिवासींच्या उपजीविकेवरच गदा येण्याची भीती निर्माण झाली आहे. कपाडिया मार्केटसमोरील परिसरात गेल्या अनेक दशकांपासून हस्तकला वस्तू, रानमेवा आणि गवतापासून तयार केलेल्या कलात्मक वस्तू विकणाऱ्या आदिवासी बांधवांना ‌‘सुशोभीकरणा’च्या नावाखाली हटवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप होत आहे. त्यामुळे माथेरानमध्ये पिढ्यान्‌‍‍ पिढ्या व्यवसाय करणाऱ्या आदिवासी समाजामध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

कर्जत तालुका हा आदिवासी बहुल भाग म्हणून ओळखला जातो. याच तालुक्यात वसलेल्या माथेरानमध्ये देश-विदेशातून हजारो पर्यटक दरवर्षी दाखल होतात. या पर्यटकांसाठी स्थानिक आदिवासी बांधव जंगलातून करवंदे, जांभुळे, आंबे, विविध रानफळे तसेच गवतापासून तयार केलेले आकर्षक बुके, फुलदाण्या आणि हस्तकला वस्तू विक्रीसाठी आणतात. या वस्तूंना पर्यटकांकडून मोठी मागणी असते.

करंजा परिसरापासून कपाडिया मार्केटपर्यंत अनेक आदिवासी कुटुंबे गेल्या 70 ते 100 वर्षांपासून छोट्या स्टॉलद्वारे आपला उदरनिर्वाह करत आहेत. मात्र, आता माथेरान गिरीस्थान नगर परिषदेकडून या परिसरात सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यात आले असून, जुन्या झाडांच्या परिसरात पर्यटकांसाठी ओटे आणि बसण्याची व्यवस्था उभारली जात आहे. यामुळे तेथे व्यवसाय करणाऱ्या आदिवासींना हटवले जात असल्याचा आरोप होत आहे.

विशेष म्हणजे, हे आदिवासी बांधव रोज डोंगर चढून माथेरानमध्ये येतात आणि दिवसभर व्यवसाय करून पुन्हा सायंकाळी डोंगर उतरून आपल्या गावी परत जातात. अत्यंत कष्टाने चालणाऱ्या या व्यवसायावरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. मात्र, पालिकेच्या भूमिकेमुळे त्यांच्या रोजीरोटीवरच संकट ओढवले आहे.

माथेरानच्या मुख्य बाजारपेठेत झाडांच्या आडोशाला बसून आदिवासी बांधव पिढ्यान्‌‍‍ पिढ्या आपला व्यवसाय करत आहेत. मात्र, आता सुशोभीकरणाच्या नावाखाली त्यांना हटवण्याचा प्रयत्न सुरू आहे. ज्या आदिवासींनी माथेरानच्या पर्यटन संस्कृतीत आणि ओळखीत मोलाचा वाटा उचलला, त्यांनाच आज शहराबाहेर ढकलण्याचे षडयंत्र रचले जात आहे का? असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. ही केवळ स्टॉल हटवण्याची कारवाई नसून आदिवासींच्या अस्तित्वावरच घाला आहे. नगर परिषदेकडे तातडीने निर्णय मागे घ्यावा, अन्यथा आदिवासी बांधव तीव्र आंदोलन करतील.

जैतू पारधी,
आदिवासी कार्यकर्ते
Exit mobile version