खराब रस्ते पर्यटन व्यवसायाच्या मुळावर

वाहतूक कोंडी व पर्यटकांची गैरसोय

| पाली/बेणसे | वार्ताहर |

रायगड जिल्हा पर्यटनासाठी नंदनवन आहे. त्यामुळे महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपुर्ण भारतातील पर्यटक, इतिहासप्रेमी, पर्यावरण अभ्यासक व भाविक जिल्ह्यात दाखल होत असतात. उन्हाळी, दिवाळी व नाताळच्या सुट्ट्यांमध्ये तर पुणे-मुंबईसह महाराष्ट्रातील निरनिराळ्या ठिकाणचे पर्यटक रायगड जिल्ह्यातील पर्यटन, एैतिहासीक व धार्मिक स्थळांवर गर्दी करतात. मात्र यातील काही ऐतिहासिक व पर्यटन स्थळांवर पोहचण्यासाठी असणार्‍या रस्त्यांची झालेली दुरवस्था व वाहतुक कोंडीमुळे पर्यटकांची मोठी गैरसोय होत आहे.

नाताळाच्या सुट्ट्या व नवर्षानिमित्त पुणे-मुंबईसह महाराष्ट्रातील निरनिराळ्या ठिकाणच्या पर्यटकांची पावले आता जिल्ह्यातील पर्यटन स्थळांकडे वळतील. जिल्ह्यातील विविध समुद्र किनारे व पर्यटन स्थळांवर गर्दी वाढू लागली आहे. येथील समुद्र किनारे, मंदिरे, ऐतिहासिक वास्तु, किल्ले, तीर्थक्षेत्र पाहण्यासाठी पर्यटकांसह शाळकरी व महाविद्यालयीन सहली व विदयार्थ्यांचा ओघ प्रचंड आहे. यामुळे पर्यटनावर अवलंबून असलेले हॉटेल व्यावसायिक, खानावळी, दुकानदार यांची सध्या चलती आहे. मात्र असे असले तरी येथे दाखल होणारे पर्यटक, भाविक व प्रवाशी मुंबई गोवा महामार्गाची झालेली दुरवस्था आणि वाहतूक कोंडीमुळे पुरते हैराण झाले आहेत. वाहतूक कोंडीमुळे पर्यटकांना तासंतास खोळंबून राहावे लागते. तसेच इच्छितस्थळी पोहचण्यास देखील उशीर होतो. जिल्ह्यात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गासह काही अंतर्गत मार्गाची अवस्था वाईट आहे.

तसेच ठिकाणी रस्त्यांची कामे अपूर्ण अवस्थेत सुरु आहेत. परिणामी येथे येणार्‍या पर्यटकांना खाचखळगे, खड्डे, अरुंद मार्ग आणि वारंवार होणारी वाहतुक कोंडी अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे फटका पर्यटन व्यवसायाला देखील बसत आहे. खराब रस्ते व वाहतूक कोंडी यामुळे असंख्य पर्यटकांनी जिल्ह्याकडे पाठ फिरवलेली पाहायला मिळत आहे. परिणामी येथील पर्यटन व्यवसायावर संकट ओढवले आहे.

पाली शहरासह जिल्ह्यातील अनेक भागाला वाहतूक कोंडीचे ग्रहण लागले आहे. प्रशासनाने लवकर या सर्व रस्त्यांची चांगल्या प्रकारे देखभाल दुरुस्ती करणे आवश्यक आहे. तसेच कोणताही रस्ता बनवितांना योग्य नियोजन करुन काम वेळेत पुर्ण करणे गरजेचे आहे. तरच पर्यटकांचा अधिक ओघ जिल्ह्यात वाढेल आणि पर्यटन व्यवसायाला व विकासाला चालना मिळेल.

महेश पोंगडे,
सामाजिक कार्यकर्ते पाली

वाहतूक कोंडीमुळे पर्यटकांची गैरसोय होते. त्यामूळे त्यांचा वेळ वाया जातो. परिणामी येथे व्यवस्थित आनंद घेता येत नाही. याशिवाय मग काही पर्यटक रायगड जिल्हा सोडून इतर जिल्ह्याकडे जसे सिंधुदुर्ग व रत्नागिरी कडे वळतात.

उमेश तांबट,
पर्यटन व्यावसायिक, सुधागड
Exit mobile version