रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे पर्यटनावर परिणाम

| मुरूड | वार्ताहर |

साडेतीनशे वर्षांपूर्वीचा जंजिरा व पद्मदुर्ग किल्ला, मुरूड, काशीद समुद्रकिनारा, खोकरीचे गुंबज, नवाबकालीन राजवाड्याचे विशेष आकर्षण असल्याने तालुक्यात वर्षभर लाखोंच्या संख्येने पर्यटक येतात. मात्र, मुख्य व अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाल्याने काही महिन्यांपासून पर्यटकांची संख्या रोडावल्याचे स्थानिक व्यावसायिकांकडून बोलले जात आहे.

साळाव-मुरूड हा 30 किलोमीटरचा रस्ता चौपदरी झाल्यास अलिबागला थांबणारे पर्यटक थेट मुरूड व दिवेआगर, श्रीवर्धनपर्यंत विनाअडथळा पोहोचू शकतील. वाहतूक सोयीचे झाल्यास पर्यटन व्यवसायाशी संबंधित व्यवसाय वाढतील आणि रोजीरोजीच्या प्रश्न सुटेल, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. लोकप्रतिनिधींकडून तालुक्यात दर्जेदार विकासकामे, रस्त्यांचे भक्कम जाळे विणले जाईल, अशी नागरिकांना अपेक्षा होती, मात्र पाच वर्षांच्या मुरूड शहरातील चित्र फारसे बदललेले नाही. मुरूड शहराला पर्यटनस्थळ म्हणून ‌‘ब’ दर्जा प्राप्त आहे, त्या तुलनेत विकासकामे मात्र दिसून येत नाहीत.

पर्यटन व्यवसायाशिवाय मुरूड तालुक्यात अन्य मोठे उद्योग-व्यवसाय नाही. जेएसडब्ल्यू उद्योग समूहात बोर्ली ते तळेखार पट्ट्यातील युवकांना आऊटसोर्सिंगच्या कामाव्यतिरिक्त अन्य काम नाही. कोकण किनारपट्टीवरील मोठा उद्योग दिघी बंदराच्या माध्यमातून उभारण्यात आला असून व्यवस्थापकीय संचालक विजय कलंत्री यांच्याकडून आता हे बंदर अदाणी उद्योग समूहाकडे हस्तांतरित करण्यात आले आहे. आगरदांडा परिसरातील लहान-मोठे उद्योग तेजीत असले तरी स्थानिकांचा या प्रकल्पास विरोध असल्याचे कारण देत अदाणी समूह आगरदांडा फेज कार्यान्वित करीत नसल्याचे कंपनीकडून सांगण्यात येत आहे. दिघी पोर्ट पूर्ण क्षमतेने सुरू झाले तर मुरूड तालुक्यातील अर्थचक्रे वेगाने फिरतील असे बोलले जात आहे. तालुक्यात मच्छीमार समाज मोठ्या प्रमाणावर असून 13 गावांत घरटी एकाच नोकरी देण्याचा करारही दिघी बंदर व्यवस्थापनाने मोडीत काढला आहे. बंदरामुळे खाडीपट्ट्यातील मासेमारी नष्ट झाल्याने मच्छीमारांची परवड होत आहे.

पारंपरिक बागायतदारांची वाताहत
मुरूड तालुक्यात निसर्ग चक्रीवादळामुळे जुन्या बागायती, वाड्या नष्ट झाल्या असून नारळ, सुपारी, आंब्यांचे उत्पादन घटले आहे. सध्या सुपारीचे 435 हेक्टर तर आंबा बागायत क्षेत्र 890 हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आहे. मात्र बदलत्या वातावरणामुळे नारळ, सुपारी पिकावर बुरशीजन्य पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव वाढल्याने उत्पादनाचा दर्जाही घसरला आहे.
कालव्याचे काम रखडले
अंबोली धरणामुळे मुरूडसह 12 गावांचा पिण्याचा प्रश्न कायमचा मिटला आहे. पर्यटनाच्या दृष्टीने ही चांगली बाब असली तरी कालव्याची कामे आठ वर्षांपासून रखडल्याने दुबार हंगामातील सिंचनात अडचणी येत आहेत. कालव्याचे काम पूर्ण झाल्यास 15 ते 20 गावांतील सुमारे 650 हेक्टर जमीन पाण्याखाली येऊन स्थानिकांना भात पिकासोबत फळावळ व दुग्ध व्यवसायासारखे जोडव्यवसाय आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी उपयुक्त ठरणार आहेत. याशिवाय कृषी पर्यटनालाही चालना मिळेल.
क्रीडा संकुलाची प्रतीक्षा
गेल्या 20 वर्षांपासून मुरूड तालुक्याला क्रीडांगणाची प्रतीक्षा आहे. रायगड जिल्ह्यातील 14 तालुक्यांना क्रीडांगणासाठी निधी मिळतो, मात्र अद्याप क्रीडा संकुलाला मुहूर्त न मिळाल्याने नवोदित खेळाडूंना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते आहे. योग्य मार्गदर्शन, सरावासाठी योग्य जागा, प्रशिक्षण मिळत नसल्याने उदयोन्मुख खेळाडूंमध्ये नाराजी आहे.
Exit mobile version