| खोपोली | प्रतिनिधी |
दरवर्षीप्रमाणे यंदाही पर्यटकांची पावले झेनिथ वॉटर फॉलच्या दिशेने वळणार आहेत. हे गृहीत धरून त्या ठिकाणी होणाऱ्या दुर्घटनांवर प्रतिबंध आणण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यास सुरुवात झाली आहे. खोपोली नगरपालिका, पोलीस स्टेशन, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था आणि स्थानिकांच्या माध्यमातून पावसाळ्याच्या सुरुवातीलाच प्रयत्न केले जात आहेत.
दरवर्षीप्रमाणे यंदाही जिल्हाधिकारी रायगड आणि रायगड पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून पर्यटन स्थळांवर पर्यटकांना येण्यास मज्जाव केला जाऊ शकतो. असे असले तरी कायदा पायदळी तुडवून पर्यटक हुल्लडबाजी आणि निसर्गाचा अतिरेकी आनंद घेण्यासाठी दाखल होतील. हे गृहीत धरूनच खोपोली नगर परिषदेच्या अग्निशमन दलाकडून झेनिथ वॉटरफॉलच्या वाटेवर ठिकठिकाणी रोप बॅरिकेडिंग केले असून अन्य उपाययोजनाही केल्या जाणार असल्याची माहिती मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांनी दिली आहे. त्याचबरोबर खोपोली पोलीस स्टेशनच्या माध्यमातून हौशी पर्यटकांवरवर करडी नजर ठेवली जाणार आहे. तसेच, कोणीही नशापाणी करून त्या ठिकाणी जाणार नाही याकडे देखील काटेकोरपणे लक्ष ठेवले जाणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक शितल राऊत यांनी दिली आहे.