| उरण | वार्ताहर |
उरण नगरपालिकेच्या भ्रष्ट कारभाराचे भयानक प्रतीक समोर येत आहे. शहरातील रस्त्यांवर अलीकडेच बसविण्यात आलेल्या निकृष्ट दर्जाच्या गतिरोधकांचे काही दिवसांतच तुकडे उडू लागले आहेत. त्यामुळे अपघाताची दाट शक्यता वर्तविली जात आहे. त्याबाबत संबंधित प्रशासनाला प्रश्न विचारल्यास उत्तर देण्यास त्यांच्याकडून टाळाटाळ होत आहे. त्यामुळे प्रशासन आणि ठेकेदार यांची मिलीभगत असल्याचा आरोप स्थानिक आणि प्रवासी वर्गाकडून होत आहे.
नगरपालिकेच्या ठेकेदारांनी शहरातील रस्त्यांवर रेडिमेन्ट प्लास्टिकचे दोनगतिरोधक बसवले आहेत. मात्र, त्याचे सुरूवातीच्या पावसातच तुकडे पडू लागले आहेत. त्यातील काही तुकडे उडून दुचाकी व इतर वाहनांवर आदळत आहेत. जर एखादा तुकडा न चुकून दुचाकीच्या चाकांत अडकला किंवा त्या तुकड्यामुळे मनं विचलित झाल्यास अपघात होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. असे असतानाही नगरपालिका याकडे दुर्लक्ष करित आहे. त्यामुळे अपघात झाल्यावरच नगरपालिकेला जाग येणार का, असा संतप्त प्रश्न स्थानिक तसेच प्रवासी वर्गातून होत आहे. दुसरीकडे, शहरातील रस्त्यांवर दुकानदार व फेरीवाल्यांनी अतिक्रमण करून वाहतूक व्यवस्था उद्ध्वस्त केली आहे. त्याबाबत लेखी तक्रारी करूनही प्रशासन त्यांच्यावर कोणतीही कारवाई करताना दिसत नाही. तसेच, फेरीवाले देखील उघडपणे सांगत आहेत की, आमचा महिन्याचा हप्ता वरपर्यंत जातोय, त्यामुळे आमचं कोण काय करणार, अशा चर्चांना उधाण येऊ लागले आहे.