| माणगाव | प्रतिनिधी |
मुंबई-गोवा महामार्गावरील टेमपाले येथील उड्डाण पुलावर ट्रकने कारला धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता कि ट्रक कारवर कोसळला. सुदैवाने यामध्ये जीवितहानी झाली नसली, तरी चारजण जखमी झाले आहेत. हा अपघात गुरुवारी (दि.5) सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडला आहे. या घटनेनंतर बराच काळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय चौधरी (22) हे कारने मुंबईकडून गोवाकडे जात होते. त्याचवेळी महाडकडून माणगांवकडे येत असलेल्या ट्रक चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने संजय यांच्या कारला समोरुन धडक दिली आणि त्यानंतर हा ट्रक त्या कारवर कोसळला. हा अपघात इतका भीषण होता की, दोन्ही वाहने उड्डाण पुलावरुन खाली कोसळता कोसळता वाचली. त्यामुळे सुदैवाने यात जीवितहानी झाली नसली, तरी या अपघातात संजय चौधरी, साहिल गुप्ता (19) व धनंजय चौधरी (20) यांच्यासह ट्रकचालक चंद्रकांत लडकत हे देखील जखमी झाले आहेत. सर्व जखमींवर माणगांव उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघातांनतर महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. अपघाताची माहिती समजताच गोरेगांव पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी इतरांच्या साह्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करुन वाहतूक सुरळीत करण्यात आली. गोरेगांव पोलीस ठाण्यात ट्रकचालक रामदास लडकतच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी गोरेगांवचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय सुर्वे आणि पोलीस उपनिरीक्षक एस.एन. रासकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार पी.के. घोडके हे अधिक तपास करित आहेत.