। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
एसटी महामंडळ आता डिजिटलायझेशनच्या दिशेने जात आहे. जास्तीत-जास्त प्रवाशांना सोयी-सुविधा देण्यासाठी काम करीत आहे. प्रवाशांकडे पैसे नसले तर बाहेर एटीएम केंद्राकडे जाऊन पैसे काढावे लागत होते. त्यावेळेत एसटीही सुटते. यावर उपाय म्हणून आता रत्नागिरी जिल्ह्यासह राज्यातील 204 बसस्थानकांवर एटीएम केंद्र असणार आहे. त्यामुळे प्रवाशांना आता पैसे काढण्यासाठी बाहेर जावे लागणार नाही.
एसटी महामंडळाचा नुकताच 77वा वर्धापन दिन साजरा झाला. महाराष्ट्र मार्ग परिवहन मंडळ देशात नंबर वन करू असा निर्धार केला आहे. प्रवाशांना चांगल्या सुविधा देवू असे आश्वासन दिल आहे. पूर्वी ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत, महिलांना 50 टक्के सवलत तिकिटात दिली आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला, तरूणींचा एसटीने प्रवास करण्याचे प्रमाण वाढले आहे.
लवकरच ई बसेस, स्मार्ट बसेस ही जिल्ह्यात येणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर चालक-वाहक व अन्य पदे भरण्याचे नियोजन महामंडळ करीत आहे. दरम्यान, आता रत्नागिरी जिल्ह्यासह राज्यातील 204 बसस्थानकावर एटीएम केंद्राची सुविधा देण्यात येणार आहे. त्यामध्ये राष्ट्रीयकृत तसेच अन्य खासगी बँकांची एटीएम सुविधा उपलब्ध होणार आहे. या संदर्भात लवकरच निविदा काढण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.