। नाशिक । प्रतिनिधी ।
कळवण ते नाशिक रस्त्यावरील कोल्हापूर फाटा येथे कार बंगल्याच्या भिंतीवर धडकली. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात बुधवारी (दि. 4) रात्री 11 वाजताच्या सुमारास झाला असून अपघातग्रस्त हे बागलाण आणि देवळा तालुक्यातील आहेत.
बागलाण तालुक्यातील नामपूर येथील भदाण आणि देवळा येथील मेतकर कुटुंबातील सदस्य कारने एका धार्मिक कार्यक्रमासाठी नाशिकला होते. तेथून परतत असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार रस्त्याच्या कडेला वळून एका बंगल्याच्या भिंतीवर आदळली. हि धडक इतकी भीषण होती की, यात शैला भदाण (62), भालचंद्र भदाण, माधवी मेतकर (32), त्रिवेणी मेतकर (4) आणि चालक खालिद पठाण यांचा जागीच मृत्यू झाला. तर उत्कर्ष मेतकरसह दोन जण जखमी झाले. मृतांमधील शैला भदाण आणि माधवी मेतकर या मायलेकी असून, त्रिवेणी ही माधवी यांची मुलगी आहे.
अपघाताची माहिती मिळताच कळवण, मानूर, कोल्हापूर फाटा परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने कळवण रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले.