। सुधागड -पाली । वार्ताहर ।
पाली तहसील कार्यालयातील लेटलतीफ व मुख्यालयी न राहणार्या कर्मचार्यांवर कारवाई करावी, कार्यालयात बायोमेट्रिक मशीन बसविण्यात यावी तसेच कार्यालयाची स्वच्छता नियमित व्हावी, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी आणि मोडी लिपी वाचक उपलब्ध करून घ्यावेत या मागण्यांसाठी मंगळवारी (ता.24) दुपारी सामाजिक कार्यकर्ते रवींद्रनाथ ओव्हाळ हे पाली तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले होते. या पार्श्वभूमीवर गुरुवारी (ता.26) पाली तहसील कार्यालयात संबंधीत शासकीय विभागांचे अधिकारी व प्रतिनिधीं सोबत बैठक संपन्न झाली. यावेळी ओव्हाळ यांच्या मागण्यांची दखल घेऊन अंमलबजावणी करण्याच्या सूचना तहसीलदार दिलीप रायण्णावार यांनी संबंधित शासकीय विभागांना दिल्या आहेत.
काही दिवसांत तहसील कार्यालयात बायोमेट्रिक मशीन बसविले जाईल व इतरही कार्यालयांना तशा सूचना दिल्या असल्याचे यावेळी तहसीलदारांनी सांगितले. तसेच मोडी लिपी वाचनासाठी माणसाची नेमणूक करावी व मोडी लिपीतील दस्ताऐवज मराठीत भाषांतरित करण्यासाठी जिल्हाधिकार्यांना पत्र पाठविण्यात येईल असे सांगितले. नागरिकांना शासकीय कामात सर्वप्रकारे सहकार्य करण्याच्या सूचना देखील तहसीलदारांनी अधिकार्यांना दिल्या. याबद्दल उपस्थित सर्व शासकीय अधिकारी व कर्मचार्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. या बैठकीस तहसीलदार दिलीप रायण्णावार, नायब तहसीलदार दिलीप कोष्टी, सामाजिक कार्यकर्ते रवींद्रनाथ ओव्हाळ, आरपीआय तालुकाध्यक्ष राहुल सोनावळे, सुधागड तालुका बौद्धजन पंचायत अध्यक्ष भगवान शिंदे आदींसह पंचायत समिती प्रशासकीय अधिकारी गजानन जाधव, तालुका कृषी अधिकारी जे. बी. झगडे, भूजल विभागाचे जे. एस. भोगले, वनरक्षक एम. एम. कराडे, कृषी पर्यवेक्षक जी. एम गायकवाड आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.