चिरनेर जंगल सत्याग्रहाच्या कार्यक्रमासंदर्भात चिरनेरमध्ये महत्वपूर्ण बैठक

। चिरनेर । वार्ताहर ।
भारतीय स्वातंत्र्य लढ्यात 25 सप्टेंबर 1930 रोजी अक्कादेवीच्या माळरानावर झालेल्या ऐतिहासिक चिरनेर जंगल सत्याग्रहाचा स्मृतिदिन रविवारी (दि.25) चिरनेर ग्रामपंचायत, उरण पंचायत समिती व रायगड जिल्हा परिषदेच्या वतीने चिरनेर येथे साजरा करण्यात येणार आहे. त्या संदर्भात सोमवारी (दि.6) महत्वपूर्ण आढावा बैठक सरपंच संतोष चिर्लेकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गेली दोन वर्ष हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम अगदी साधेपणाने करण्यात आला होता. परंतु यावर्षी कोरोना संकटाचे निर्बंध उठल्याने यंदाचा चिरनेर जंगल सत्याग्रहाचा हुतात्मा स्मृतिदिन जोरदारपणे साजरा करण्याचा निर्णय या नियोजन बैठकीत घेण्यात आला आहे.
सत्याग्रहात बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचे स्मरण कायम व्हावे, यासाठी दरवर्षी 25 सप्टेंबर रोजी चिरनेर येथे हुतात्मा दिन शासकीय इतमात साजरा होत असतो. या कार्यक्रमास लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील मान्यवर, सर्व राजकीय पक्षांचे नेते, सामाजिक क्षेत्रातील मंडळी, नागरिक व विद्यार्थ्यांना आमंत्रित करण्यात येते. यावर्षीही या सर्वांना निमंत्रित केले जाणार असल्याचे ठरावात नमूद करण्यात आले आहे.

कार्यक्रमाची वेळ दहा ते बारा असून यावेळी ठीक बारा वाजता चिरनेर जंगल सत्याग्रहातील स्वातंत्र्य शूरवीरांना शासकीय इतमात मानवंदना देण्यात येईल. तसेच कार्यक्रमाला मान्यवर आणण्याची जबाबदारी प्रत्येक राजकीय पक्षावर टाकण्यात आली आहे. या नियोजन बैठकीस राजिपचे सदस्य बाजीराव परदेशी शेकापक्षाचे चिटणीस सुरेश पाटील, तंटामुक्तीचे चिरनेर गावअध्यक्ष अलंकार परदेशी, उरण पंचायत समितीचे विस्तार अधिकारी अनिल नारंगीकर, ग्रामविकास अधिकारी महेश पवार, सामाजिक कार्यकर्ते प्रफुल्ल खारपाटील, ग्रामपंचायतीच्या सदस्या सविता केणी, ग्रामपंचायतच्या सदस्या शितल घबाडी, ग्रामपंचायतीच्या सदस्या संध्या ठाकूर, सामाजिक कार्यकर्ते सचिन घबाडी, ग्रामपंचायतीचे सदस्य धनेश ठाकूर, ग्राहक मंचाचे अध्यक्ष शशांक ठाकूर, ग्रामपंचायतीचे सदस्य रमेश फोफेरकर, कार्यकर्ते सुशांत पाटील, कार्यकर्ते अरुण मुंबईकर, विभाकर ठाकूर तसेच पत्रकार दत्तात्रेय म्हात्रे उपस्थित होते.

Exit mobile version