कॉटेज चालकांसाठी महत्वाची सुचना

| अलिबाग | प्रतिनिधी |
पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचे असलेल्या नागाव येथील कॉटेज चालकाला दोन दिवसांपुर्वी पोलीस असल्याचा कॉल आला होता. कॉटेजमध्ये अश्लील व्हीडीओ बनविल्याची तक्रार केल्याचे भासविले जाऊन ऑनलाईन आर्थिक लुट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे तुमचीही फसवणूक होऊ शकते. कॉटेज चालकांनी सावध रर्हों असे आवाहन करण्यात येत आहे.

अलिबाग तालुक्यातील नागाव हे पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचे स्थळ ठरत आहे. नारळी पोफळीच्या बागा, सुंदर असा समुद्रकिनारा पर्यटकांना कायमच आकर्षित करीत आला आहे. त्यामुळे मुंबई, पुणेसह वेगवेगळ्या भागातून असंख्य पर्यटक नागावला भेट देतात. नागाव समुद्रकिनारी पर्यटकांची वर्दळ वाढल्याने स्थानिक व्यवसायिकांनादेखील चालना मिळू लागली आहे. वेगवेगळे फार्म हाऊस, कॉटेज नागाव समुद्रकिनारी आहेत.

घरगुती जेवणाचा आनंद या कॉटेजेच्या माध्यमातून पर्यटकांना मिळत आहे. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून नागावमधील कॉटेल चालकांना एक फसवणुकीचा कॉल येत असल्याची चर्चा आहे. संभाजी नगर पोलीस ठाण्यातून एपीआय बोलतोय, तुमच्या कॉटेजमध्ये संभाजी नगरमधून एक कपल आले होते. त्या मुलाने मुलीचे अश्लील व्हीडीओ बनविला आहे. त्यामुळे मुलीने पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पीआय साहेबांनी तुमच्याशी बोलायला सांगितले आहे. तक्रारीत तुमच्या कॉटेजचे नाव येऊ शकते. तुमच्या नावाची तक्रार झाल्यावर सतत तुम्हाला नागपुर न्यायालयात फेऱ्या माराव्या लागणार आहेत. त्यात तुमचा कॉटेज सील केला जाईल. तुमचे तक्रारीत नाव नको असेल तर वीस हजार रुपये जीपे करा अशा प्रकारची धमकी देऊन पैसे बळकावण्याचा प्रकार समोर येत आहे. या कॉलमुळे कॉटेज व्यवसायिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून भितीचे वातवरण देखील निर्माण झाले आहे. कॉटेज चालकांनो तुमचीही फसवणूक होऊ शकते. कोणत्याही अमिषाला बळी पडू नका सावध रहा असे आवाहन करण्यात येत आहे.

बोगस कॉलवर विश्वास ठेवून नका
अलिबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील व्यवसायिकांना पोलीस असल्याचे भासवून, तक्रार होऊ नये म्हणून ऑनलाईन पध्दतीने पैसे मागितले जात असल्याची चर्चा आहे. व्यवसायिकांसह नागरिकांनी अशा बनवाट कॉलवर भरोसा न ठेवता कोणत्याही प्रकारचे ऑनलाईन आर्थिक व्यवहार करू नये असे आवाहन अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक पवार यांनी केले आहे.

Exit mobile version