| नेरळ | प्रतिनिधी |
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली तसेच महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणेच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य विनायक काशिद यांनी वदप गावचे प्रगतशील शेतकरी निलिकेश बाळासाहेब दळवी यांच्या अभियांत्रिकी कर्मशाळेत भेट दिली. त्यांनी बनविलेल्या विविध यंत्रांची पाहणी केल्यावर सुधारित ड्रम सीडर (भात बियाणे पेरणी यंत्र) भात उत्पादक शेतकर्यांसाठी फायदेशीर असल्याचे मत व्यक्त केले.
भातशेती परवडण्यासाठी मजुरांवर होणारा खर्च कमी करणे आवश्यक असल्याने यांत्रिकीकरणाची कास धरणे महत्त्वाचे आहे, हे हेरून स्व. बाळासाहेब दळवी यांनी सुधारित ड्रम सीडर यंत्र बनविले होते. त्यांची दोन्ही मुले निलिकेश आणि नयनिश यांना अभियांत्रिकी क्षेत्रात विशेष आवड असल्याने ते वेगवेगळे प्रयोग करीत असतात. हैद्राबादच्या भात संशोधन संचालनालयाने बनविलेल्या ड्रम सीडरमध्ये नावीन्यपूर्ण बदल करून त्यांनी सुधारित ड्रम सीडर बनविला आहे. या यंत्राने ओल्या तसेच सुक्या वाफ्यावरही भात बियाणांची पेरणी करता येते. पेरणी केल्यानंतर चौथ्या-पाचव्या दिवशी ‘साथी’ हे तणनाशक युरियामध्ये मिसळून फोकून दिल्यास फक्त तण मरते, मूळ पिकास धोका होत नाही. ही पद्धती अवलंबविल्यास लावणी करण्याची गरज राहात नाही. त्यामुळे हेक्टरी 23 मजुरांची बचत होते, असे निलिकेश दळवी यांनी सांगितले.
या यंत्राबद्दल काशिद हे खूप प्रभावित झाले. त्यांनी दळवी यांचे अभिनंदन केले आणि कृषी विद्यापीठाकडून शक्य ती सर्व मदत करण्याचे अभिवचन दिले. यावेळी त्यांना पावर ट्रिलरचलित भात कापणी यंत्र आणि कंबाईंड हार्वेस्टरचीही माहिती देण्यात आली. अन्य प्रगतशील शेतकरी विनय वेखंडे आणि कैलास दळवी यांनी त्यांना भात बीजोत्पादन संस्थेची माहिती दिली. यानिमित्ताने निलिकेश दळवी यांनी काशिद यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी काशिद यांच्यासोबत पारिवारिक सदस्य आणि विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र मर्दाने उपस्थित होते.