पेणसह नवी मुंबईला अशुध्द पाणीपुरवठा

शुध्द पाण्यासाठी वंचितचे लाक्षणिक उपोषण

| रायगड | खास प्रतिनिधी |

पेण येथील हेटवणे धरणातून अंतोरे, नवघर, पाटणोली, वरेडी, हमरापूर, जिते विभागातील तब्बल 30 हुन अधिक गावांना होणारा पाणी पुरवठा दूषित व दुर्गंधीयुक्त आहे. विशेष म्हणजे याच हेटवणे धरणाचे पाणी नवी मुंबईला देण्यात आले आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांना देखील दूषित पाणीपाणी पुरवठा होत असल्याची बाब वंचित बहुजन आघाडीचे पेण तालुका अध्यक्ष देवेंद्र कोळी यांनी अधोरेखित केली आहे. या विरोधात त्यांनी रायगड जिल्हा परिषदेसमोर लाक्षणिक उपोषण आंदोलन केले. पेण तालुक्यातील जनता अशुध्द पाणी पित असताना मात्र स्थानिक आमदार मात्र मूग गिळून गप्प का असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे.

पेण तालुक्यातील अंतोरे, नवघर, पाटणोली, वरेडी, हमरापूर व जिते विभागातील तब्बल 30 हुन अधिक गावांना होणारा पाणीपुरवठा दूषित व दुर्गंधीयुक्त आहे. पाणी पुरवठ्यामुळे या परिसरातील जनतेला अतिसार, पटकी, विषमज्वर, कावीळ यासारखे घातक आजार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पाणी शुद्ध व निर्जन्तुक करण्यासाठी फिल्टर प्लान्टची व्यवस्था करावी व फिल्टर केलेलेच पाणी या परिसरातिल नागरीकांना वितरीत करण्यात यावे. पाण्याचे निर्जंतूकीकरण वेळोवेळी व योग्य पध्दतीने करावे. सातत्याने पाण्याची तपासणी करून गुणवत्ता पडताळण्यात यावी. पाणी पिण्यास अयोग्य असे रिपोर्ट आल्यास पाणी पुरवठा विभागाच्या अधिकारी अन्य अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी देवेंद्र कोळी यांनी केली आहे.

पाणी पुरवठा योजनांची व स्त्रोतांची देखभाल व दुरूस्ती स्थानिक पातळीवर वेळच्यावेळी करण्याच्या सुचना पाणीपुरवठा विभागाला देण्यात याव्यात. अंतोरे, नवघर, पाटणोली, वरेडी, हमरापूर व जिते विभागातील स्रोतांचे नमुने घेवून त्यांची जैविक व रासायनिक तपासणी प्रत्येक महीन्यांतुन दोन वेळा करण्यात यावी. दूषित पाणी पुरवठा होणाऱ्या या 30 गावांमध्ये बोर्झे गावात साकारण्यात आलेली योजना राबवावी. प्रत्येक गावात मध्यवर्ती ठिकाणी, शक्य असल्यास ग्रामपंचायतीच्या प्रत्येक वॉर्डात मरिव्हर्स ऑस्मोसिसफ वॉटर प्लॅन्टची अवश्यकते नुसार उभारणी करण्यात यावी. हेटवणे धरणाच्या पाण्याची पातळी खाली गेल्यानंतर सिडकोच्या पाण्यातुन अशुद्ध पाणी पुरवठा होतो, हेटवणे धरणाची पाण्याची पातळी प्रमाणा पेक्षा कमी होणार नाही यासाठी प्रयत्न होण्याची अवश्यकता आहे, असे देवेंद्र कोळी यांनी सांगितले.

दरम्यान, पेण तालुक्यातील जनतेला हेटवणे धरणातील अशुध्द पाणीपुरवठा होत असल्याची बाब लक्षात येताच. जनतेला शुद्ध पाणी पुरवठा करण्यात यावा अशा सुचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या असल्याचे पेणचे भाजपा आ. रविंद्र पाटील यांनी कृषीवलशी बोलताना सांगितले. जलजीवन मिशन योजनेतून पाणी पुरवठ्याची कामे सुरु आहेत. लवकरच सदरची पूर्ण होतील, असे रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील यांनी स्पष्ट केले.

Exit mobile version