४८ तासात पात्रुदेवी मंदिरातील चोरटा गजाआड

अलिबाग पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी
| अलिबाग । विशेष प्रतिनिधी |
अलिबागकरांचे श्रध्दास्थान असलेल्या कार्लेखिंड येथील पात्रुदेवीची मूर्ती आणि अन्य सामान चोरुन नेणार्‍या चोरटयाला अलिबाग पोलिसांनी पाथर्डी, अहमदनगर येथून गजाआड केले. या चोरीच्या घटनेनंतर अलिबाग पोलिस निरीक्षक शैलेश सणस यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवीत 48 तासातच चोरटयाचा शोध लावून अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथून जेरबंद करण्यात यश मिळविले आहे. अलिबाग पोलिसांच्या या कौतुकास्पद कामगिरीमुळे सर्वत्र कौतुक केले जात आहे.


दिलीप घोडके असे चोरटयाचे नाव असून त्याच्याकडून चोरी केलेल्या मुर्त्यांसह, दानपेटी, घंटा, तलवार आदी सर्वच मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. कार्लेखिंड येथील पात्रुदेवीचे मंदीर आहे. पोलिस उपनिरीक्षक ओमप्रकाश कावळे आणि त्यांचे सहकारी पोलिस हवालदार शेलार यांनी पोलिस निरीक्षक शैलेश सणस यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्यात सखोल तपास करुन चोरटयाला बेड्या ठोकल्या आहेत.


बुधवार 11 ते 12 जानेवारीदरम्यान अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या वेळेस मंदिराचे कुलूप तोडून मंदिरातील मूर्ती व इतर 7 हजार 800 रुपये किमतीचे साहित्य चोरुन नेले होते. याबाबत अलिबाग पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक ओमप्रकाश कावळे हे करीत होते. अलिबाग पोलिसांनी चोरीनंतर संपूर्ण राज्यात प्रत्येक पोलिस ठाण्यात संपर्क साधून चोरटयांचा कसून शोध सुरु केला होता. त्यानुसार चाळीसगाव पोलिसांच्या सहकार्याने दिलीप घोडके याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कार्लेखिंडीतील पात्रुदेवी मंदिरात केलेल्या चोरीतील सर्व मुद्देमाल सापडला. सदर चोरटयाला लवकरच अलिबाग येथे आणण्यात येणार आहे. त्याच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिस निरीक्षक शैलेश सणस यांनी व्यक्त केली आहे.

Exit mobile version