आठ आगारांतून 50 एसटी बस फेऱ्यांचे नियोजन
| रायगड | प्रमोद जाधव |
दिवाळीचा सण कुटुंबियांसमवेत साजरा करण्यासाठी गावी जाणाऱ्यांची संख्या प्रचंड असते. प्रवाशांच्या गर्दीचा विचार करता, यावर्षी दिवाळीनिमित्त ज्यादा एसटी बसेस सोडण्याचा निर्णय एसटी महामंडळ रायगड विभागाने घेतला आहे. जिल्ह्यातील आठ आगारांतून लांब पल्ल्यासह लोकल स्तरावर एसटी बसच्या 50 फेऱ्यांचे नियोजन केले आहे. पाच नोव्हेंबरपर्यंत या फेऱ्या सुरू राहणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
रायगड जिल्ह्यात दिवाळी सण उत्साहात साजरा केला जातो. दिवाळीनिमित्त 12 दिवस सुट्टीदेखील जाहीर झाली आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातून बाहेरगावी जाणारे आणि बाहेरगावातून अलिबागसह जिल्ह्यात येणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. सुट्टी असल्याने पर्यटकांचादेखील ओघ वाढण्याची शक्यता आहे. प्रवाशांसह पर्यटकांना चांगली सेवा मिळावी, एसटीच्या उत्पन्नात वाढ व्हावी, म्हणून एसटी महामंडळ रायगड विभागाने दिवाळीसाठी ज्यादा एसटी बसेसचे नियोजन केले आहे. जिल्ह्यातील अलिबाग, महाड, पेण, श्रीवर्धन, कर्जत, रोहा, मुरूड, माणगाव या आगारातून लांब पल्ल्याच्या गाड्या सोडल्या जाणार आहेत. महाड आगारातून अहमदनगर, तुळजापूर, अलिबाग आगारातून उमरगा, पेणमधील नंदूरबार, श्रीवर्धनमधून तुळजापूर, कर्जतमधून धुळे, रोहामधून पाथर्डी, लातूर, मुरूडमधून अक्कलकोट, माणगावमधून कळंब आणि अहमदनगर बसेस सोडल्या जाणार आहेत. तसेच महाड आगारातून पनवेल, अलिबाग-पनवेल, अलिबाग-पनवेल, पेण-पनवेल, पेण-खोपोली, श्रीवर्धन-माणगाव, श्रीवर्धन-बोरीवली, श्रीवर्धन-डोंगरी, कर्जत-पनवेल, कर्जत-पनवेल-अलिबाग, रोहा-पनवेल, मुरूड-पनवेल एसटी बसेस पाठविल्या जाणार आहेत. एकूण 50 फेऱ्यांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यामध्ये मध्यवर्ती कार्यालयांतून 25, प्रादेशिक कार्यालयाकडून सात आणि विभागीय कार्यालयाकडून मंजुरी देण्यात आलेल्या 18 फेऱ्यांचा समावेश आहे.





