। अलिबाग । शहर वार्ताहर ।
कोरोना या संसर्गजन्य आजारामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबास अथवा निकटवर्ती नातेवाईकास शासनाकडून 50 हजार रुपयांची सानुग्रह मदत करण्यात येणार आहे. यासाठी संबंधितांनी राज्यशासनाकडून सुरु करण्यात आलेल्या वेबपोर्टलवर ऑनलाइन अर्ज दाखल करण्याचे आवाहन पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, महसूल व वन (आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन) विभागाने जारी केलेल्या शासना निर्णयानुसार ज्या व्यक्तीचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे, अशा व्यक्तीच्या वारसांना किंवा निकटच्या नातेवाईकांना सानुग्रह मदत देण्यात येणार आहे. यासाठी राज्यशासनाच्या संकेतस्थळावर भेट देत, अर्जदाराला स्वतः किंवा सेतु केंद्रामधून तसेच ग्रामपंचायतीमधून सीएससी-एसपीव्ही मधून अर्ज करु शकेल.
पालिका आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्जदाराची आणि मृत व्यक्तींची आधार कार्डची प्रत, जन्म आणि मृत्यु नोंदणी कायदा, 1969 अंतर्गत मृत व्यक्तींचे मृत्यु प्रमाणपत्र, अर्जदाराचा आधार लिंक केलेला बँक खाते क्रमांक, अर्जदाराच्या खात्याची रद्द केलेली चेकची प्रत, मृत्यूच्या कारणाचे वैद्यकीय प्रमाणपत्र, आरटीपीसीआर अहवाल प्रत किंवा सीटी स्कॅन प्रत किंवा इतर वैद्यकीय कागदपत्रे (जेव्हा कागदपत्र क्र. 6 उपलब्ध नाही) तसेच इतर निकट नातेवाईकांचे ना-हरकत असल्याचे स्वयंघोषणापत्र या आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन अर्ज दाखल करणे बंधनकारक असणार आहे. एखादे प्रकरण नामंजूर झाल्यास त्यावर अर्जदाराने जिल्हास्तरावरील तक्रार निवारणासाठी गठीत करण्यात आलेल्या तक्रार निवारण समितीचे सचिव डॉ.आनंद गोसावी यांच्यामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे यांच्याकडे तक्रार अर्ज सादर करण्याची सूचनाही करण्यात आली आहे.