हरिहरेश्वरमध्ये निर्माल्यातून दरवळला श्रद्धेचा सुगंध

सुवर्ण गणेश, सोमजाई मंदिर देखील होणार उपक्रमात सहभागी


| दिघी | वार्ताहर |

श्रीवर्धन तालुक्यातील हरिहरेश्वर तीर्थस्थळी भक्तिभावाने वाहिलेल्या निर्माल्यापासून अगरबत्ती तयार करण्याची अत्यंत अभिनव योजना हरिहरेश्वर विश्वस्तांनी सुरू केली आहे. या स्तुत्य उपक्रमात पुढाकार घेणारे कोकण किनारपट्टीवरील हे पहिलेच मंदिर असल्याचे बोलले जाते.

देशातील प्रमुख तीर्थक्षेत्र म्हणून दक्षिण काशी अशी ओळख असणाऱ्या हरिहरेश्वर येथे भाविकांची नेहमीच गर्दी पाहायला मिळते. येथे दर्शनाला आलेल्यांंकडून देवा चरणी फुल, बेलपत्र वाहिले जातात. गेले कित्येक वर्षे मंदिरातील निर्माल्य समुद्रात विसर्जित करण्यात यायचे. आता मात्र भाविकांची वाढती गर्दी पाहता निर्माल्य जास्त प्रमाणात होत आहे. त्याचे विघटन कसे करावे याचा विचार करण्यात आला.
संस्थेचे सचिव सिद्धेश पोवार यांनी निर्माल्यापासून आपण अगरबत्ती तयार करण्याची कल्पना सुचवल्याने सर्वानुमते होकार मिळाला. निर्माल्यापासून अगरबत्ती बनविणारे पुणे येथील श्रीराम कुंठे यांची भेट घेण्यात आली. याकामी अध्यक्ष वामन बोडस व सचिव सिद्धेश पोवारसह सर्व विश्वस्तांनी पुढाकार घेऊन कुंठे यांच्या सहकार्याने मंदिरातील पवित्र निर्माल्यापासून बनवलेल्या अगरबत्तीचा बुधवारी शुभारंभ करण्यात आला.

गावकऱ्यांनी देखील आपल्या घरातील पूजेचे निर्माल्य मंदिरात आणून द्यावे जेणे करून त्याचे योग्य प्रकारे विघटन होईल. तसेच सदर निर्माल्यापासून बनविण्यात आलेली अगरबत्ती मंदीराचे देणगी कक्ष कार्यालयात विक्री करिता उपलब्ध असून भाविकांनी तसेच ग्रामस्थांनी त्याचा लाभ नक्की घ्यावा, असे आवाहन मंदिर व्यवस्थापनाकडून करण्यात येत आहे.

Exit mobile version