ममदापूर ग्रामपंचायतीमध्ये ‌‘मुकादम’गिरी

अधिकाऱ्याची बदलीच्या ठिकाणी जाण्यास टाळाटाळ

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील ममदापूर ग्रामपंचायतीमधील ग्रामविकास अधिकारी यांची बदली झाली असतानादेखील मागील काही दिवस सायंकाळी उशिरा कार्यालयात येतात. रात्री उशिरापर्यंत ते कॅशबुक घेऊन कामे करीत असून, ग्रामपंचायत सरपंच आणि सदस्यांनी आक्षेप घेतल्यानंतरदेखील ग्रामविकास अधिकारी हे आपली मुकादमगिरी कायम ठेवून आहेत. शेवटी गटविकास अधिकारी यांच्याकडून ग्रामपंचायत कार्यालय तीन दिवसांसाठी बंद ठेवण्याची कार्यवाही करावी लागली होती, ते कार्यालय सोमवारी उघडले आहे.

नेरळ संकुल विकास प्राधिकरण क्षेत्रातील ग्रामपंचायत ममदापूरमध्ये 15 टक्के अनुदान व 14 वा वित्त आराखडासंदर्भात प्रशासनिक कारवाई प्रलंबित आहे. सतत वादात सापडत असलेली ममदापूर ग्रामपंचायत आणि तेथील ग्रामविकास अधिकारी सूरज मुकादम यांना बदलीचे आदेश दिले. त्यानंतर ग्रामविकास अधिकारी मुकादम हे बदलीच्या ठिकाणी न जाता ममदापुर ग्रामपंचायत कार्यालयात येतात आणि कॅशबुक घेऊन रात्री उशिरा पर्यंत कामे करीत असतात. मुळात, सप्टेंबर महिन्यात बदली झाली असल्याने ग्रामविकास अधिकारी यांनी बदलीच्या ठिकाणी जावे आणि नवीन ग्रामविकास अधिकारी गोसावी यांना पदभार द्यावा, अशी स्थानिक सरपंच आणि सर्व सदस्य यांची होती. मात्र, मुकादम यांनी आधी ग्रामपंचायतीमधील कर्मचाऱ्यांवर मुकादमगिरी केली आणि त्यांनतर सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांवर मुकादमगिरी करण्यास सुरुवात केली.

कर्जत पंचायत समितीचे गट विकास अधिकारी चंद्रकांत साबळे यांच्या कार्यालयाने दिलेले बदलीचे आदेश न स्वीकारता नवीन ग्रामविकास अधिकारी एम.डी. गोसावी यांना ममदापूर ग्रामपंचायत कारभार सांभाळण्याचे आदेश असतानाही त्यांना अधिकार देण्यास, हजर करून घेण्यास मुकादम हे टाळाटाळ करीत होते. सरपंच दामा निरगुडा ग्रामसेवक सूरज मुकादम यांना कार्यालयाबाहेरील कडीकोयंडा लावून रात्री दहाच्या सुमारास डांबून ठेवले होते. सहा ऑक्टोबर रोजी सरपंचांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली.

दरम्यान, याप्रकरणी सरपंच व सर्व सदस्य यांच्या उपस्थितीत सुनावणी घेतल्याने ग्रामसेवक सूरज मुकादम यांनी माफी मागितली आहे. परंतु गटविकास अधिकारी यांनी सोमवार पर्यंत ग्रामपंचायत कार्यालय न उघडण्याचे आदेश दिले होते. गेली चार दिवस ममदापुर ग्रामपंचायतीचे कार्यालय बंद असून, सोमवारी पंचायत समितीकडून चौकशीसाठी विभागाचे विस्तार अधिकारी चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत उघडण्यात आले. विस्तार अधिकारी पाटील सर्व कागदपत्रांची खात्री करून त्याचा अहवाल गटविकास अधिकाऱ्यांकडे सादर करणार आहेत.

Exit mobile version