| कर्जत | प्रतिनिधी |
मी जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर अनेक ठिकाणी मला डावलण्यात आले. काही कार्यकर्त्यांमुळे सुनील तटकरे माझ्यापासून दूर जाऊ लागल्याचे जाणवू लागले. माझी अडचण होऊ लागल्याचे मला वाटू लागले. या सार्याला कंटाळून मी पक्षाच्या जिल्हाध्यपदाचा राजीनामा दिला. अशी स्पष्टोक्ती माजी आमदार सुरेश लाड यांनी मंगळवारी (दि.7) कर्जत येथे केली.

लाड यांनी आपली खदखद व्यक्त करण्यासाठी दहीवली येथील राष्ट्रवादी भवनच्या सभागृहात हितचिं संवाद सभेचे आयोजन केले होते. याप्रसंगी माजी जि.प. अध्यक्ष सुरेश टोकरे, उपाध्यक्ष सुधाकर घारे, माजी सभापती तानाजी चव्हाण, अशोक भोपतराव, एकनाथ धुळे, शरद कदम, तालुकाध्यक्ष भगवान चंचे, महिला तालुकाध्यक्ष रंजना धुळे, माजी जिल्हा परिषद सभापती नरेश पाटील, माजी नगराध्यक्ष शरद लाड, रजनी गायकवाड, नगरसेवक – नगरसेविका आदी व्यासपीठावर उपस्थित होत्या.
यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना, खालापूर तालुक्यातील काही निर्णय माझ्या मना विरुद्ध घेण्यात आले. निवडणुकीच्या काळात मी सांगितले की, महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुका लढविल्यास आमची काही हरकत नाही. मात्र खालापूर तालुक्यातील काही आपले गद्दार नेते आमदारांशी चर्चा करत राहिले. काही कार्यकर्ते अगदी त्यांच्या पायाही पडत होते, असे ते म्हणाले. तुम्ही आम्हाला विकास निधी द्या, कामे करा आम्ही तुमची मतपेटी भरून देऊ असेही उघडपणे बोलत होते. उरणच्या दौर्यात मला डावलण्यात आले. मला एकटे पाडण्याचा प्रयत्न सातत्याने होऊ लागला, असे त्यांनी सुचित केले.
माझा गेल्या निवडणुकीत पराभव झाला. त्यानंतर अजित पवार यांनी भाजपाबरोबर जाऊन पहाटेचा शपथ विधी आणि सरकार स्थापन केले होते. मात्र ते सरकार केवळ 72 तास टिकले. त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार आले. त्यावेळी मला ज्यांनी पराभूत केले होते. ते सत्तेत आले. ते सुद्धा मी स्वीकारले होते. परंतु प्रशासकीय इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्यात केवळ शिवसेनेचे धनुष्यबाण लावून त्या समारंभाचा घाट घातल्याने आपण प्रतिकात्मक भूमिपूजन केले. तसेच अदिती तटकरे यांचा एका खोपोलीतील कार्यक्रमात मांजर आडवी गेली असा उल्लेख या आमदारांनी केला. हे कितपत सहन करायचे? किती सहन करायचे. असे स्पष्ट केले.
एका विद्यार्थी संघटनेच्या कार्यक्रमात सुधाकर घारे यांचा फोटो लावला नाही म्हणून आपल्या पक्षातील काही प्रमुख कार्यकर्त्यांनी काय-काय केले? त्यामुळे मी सांगितले या पुढे फोटो व नाव वापरू नका. अशा अनेक घटना आहेत. असे सांगून त्यांनी कोंढाणे धरण, मोरबे धरण आदींचाही उहापोह केला. अनेक घटना सांगितल्या. काही कार्यकर्त्यांना वाटले होते सुरेश लाड आता कोणत्यातरी पक्षात जातील. परंतु तसे काहीही जाहीर न झाल्याने त्यांनी सुटकेचा निःश्वास जाणवत होते. या सभेमुळे कर्जतचे राजकीय वातावरण मात्र तापले आहे. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस मधील खदखद हा तालुक्यात चर्चेचा विषय बनला आहे.