पनवेलमध्ये अजितदादा गटात उलथापालथ

प्रमुख पदाधिकार्‍यांसह कार्यकर्ते अजितदादांना रामराम ठोकण्याच्या तयारीत

। पनवेल । साहिल रेळेकर ।

राज्याच्या निवडणुकीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच राजकीय घडामोडींना वेग येऊ लागला आहे. प्रत्येक राजकीय पक्षात वरिष्ठ नेत्यांकडून उमेदवारांना व पदाधिकार्‍यांना बळ दिले जात असतानाच पनवेल शहर जिल्ह्यातील अजित पवारांच्या राष्ट्रवादीत नाराजीचा सुर उमटू लागल्याचे समोर येत आहे. राष्ट्रवादी पक्षातील प्रमुख पदाधिकारी व ज्येष्ठ कार्यकर्ते विद्यमान जिल्हाध्यक्षांविरोधात एकवटले असून कोणत्याही क्षणी मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

पनवेल विधानसभा मतदारसंघात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील प्रमुख पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे. या परिस्थितीला पनवेल शहर जिल्हाध्यक्ष जबाबदार असल्याचे खासगीत बोलले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून पक्षातील प्रमुख पदाधिकार्‍यांनी जिल्हाध्यक्ष महादेव पाटील यांच्याविरोधात नाराजी व्यक्त केली होती. याबाबत पक्षनेतृत्वाकडे देखील नाराजीची कारणे स्पष्ट करण्यात आली होती. मात्र नेतृत्वाकडून कोणताही हस्तक्षेप न करता दुर्लक्ष केले जात असल्याने पदाधिकार्‍यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षाला रामराम ठोकण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीनंतर राजकारणात मोठी उलथापालथ झाली. पक्षाच्या विभागणीनंतर शरद पवार व अजित पवार गट असे दोन गट पडले. रायगडच्या राजकारणतील हुकूमी एक्का म्हणून समजले जाणार्‍या खासदार सुनील तटकरे यांनी अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. तर जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्यासोबत ठाम राहणे पसंत केले. मधल्या काळात तत्कालीन पनवेल शहर राष्ट्रवादीचे जिल्ह्याध्यक्ष सतीश पाटील यांनी सुनील तटकरे यांची साथ सोडून शरद पवार यांच्या गटात घरवापसी केली. त्यामुळे रिक्त झालेल्या जिल्हाध्यक्षपदी अजितदादा गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी महादेव पाटील यांना पनवेल शहर जिल्ह्याध्यक्षपदाची सूत्रे हाती दिली.
मात्र या जबाबदारीबद्दल पहिल्या दिवसापासूनच नाराजीची धुसफूस पक्षामध्ये पाहायला मिळत होती. काही ठिकाणी खासगीत तर काही ठिकाणी उघडपणे जिल्हाध्यक्षांविरोधात रोष पाहायला मिळत होता. पक्षात मान सन्मान न देणे, पक्ष बैठीकला न बोलावणे, मित्र पक्षाच्या आमंत्रणाला एकटे जाणे तसेच पक्षासाठी कोणतेही कार्यक्रम न घेणे अशा अनेक तक्रारी पक्षातील जबाबदार पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून बोलून दाखवल्या जाऊ लागल्या. त्यामुळे पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर येऊ लागला होता. आता ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते पक्षाला रामराम ठोकण्याच्या तयारीत आहेत.

Exit mobile version